कुछ कह रही है किताबे

पोटापुरता पसा पाहिजे नको पिकाया पोळी
देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी

कोण्या अनामिक कवीची ही कविता माझ्याबाबतीत अगदी खरी आहे. पुस्तकांच्या बाबतीत माझी झोळी फाटकी आहे. इतकं लिहून झालेलं आहे की ते वाचायला, सामावून घ्यायला, विचार करायला अपुरं आहे. मग ती कविता असो, कादंबरी असो, कथा असो, आयुष्याचा एक कालखंड त्या त्या वेळी सुगंधित करून गेली. यात कवितेचं एक वेगळच स्थान आहे. अनेक मूड्स आणि अनेक भावनांच्या गदारोळात कवितेने साथ नाही सोडली. कधी विमनस्क, उदास अवस्थेत बसले असताना.. "ओळखलंत का सर मला पावसात आलं कोणी, कपडे होतो कर्दमलेले केसावरती पाणी"... ही कविता बळ देऊन गेली. "मोडून पडला संसार तरी मोडत नाही कणा..." या ओळींनी जवळ असलेल्या कण्याची जाणीव दिली.
तर कधी मी सापडले स्वत: ला कवी अनिल यांच्या या कवितेत-

  केळीचे सुकले बाग
 असुनिया पाणी,
 कोमेजली कवळी पाने,
 असुनी निगराणी

दूर कुठेतरी वणवा पेटला आहे पण केळ इतकी संवेदनशील आहे की तिला ती झळ जाणवते आहे. तिच्या भवताली चांगली परिस्थिती असताना देखील ती कोमेजली आहे. तिच्यातला जीवनरस सुकत चालला आहे. 

किती जरी घातले पाणी
सावली केली
केली चे सुकले प्राण
बघुनी भवताली

ही कविता मला खूप जवळची वाटते. कधी अस्वस्थ चंचल मन पुस्तके वाचून शांत झाले तर कधी अधिकच उफाळले. कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही, सदरहू पीक आम्ही आमच्या आसवांवर काढले आहे म्हणारे यशवंत मनोहर अस्वस्थ करून जातात. ही अजून एक कविता तशीच अस्वस्थ करणारी..

दुखतच नाही त्याला
दु:ख तरी कसे म्हणू?
लागतच नाही पाणी
किती खणू किती खणू?
दु:ख नाही इजा नाही
सुख नाही मजा नाही
सजा मात्र अशी काही
धड जगू देत नाही

कसे मनातल्या भावनेला शब्दात पकडले आहे! काय बरं सांगायचे असेल कवीला? कोणती सजा त्याला मिळालेली आहे? सगळंच अनाकलनीय!
तर कधी महानोरांची ही प्रसन्नतेचा छिडकावा करणारी ही कविता -

पक्षांचे लक्ष थवे
गगनाला पंख नवे
तेजोमय विश्वाचे
ओठावर गीत नवे

जणू माझ्या भोवाताली प्रकाशमान विश्व पसरले आहे. त्या उभा राहून मी उद्याचे मंगल गीत गातो आहे. विजीगिषु वृत्तीने मी पुढे आणि पुढेच जाणार आहे अशी काहीशी जाणीव होते.

कुसुमाग्रजांसारख्या कवीला एका फुलाकडे बघताना

माझ्या शुद्ध भावनांचा कोठे करू मी सांभाळ,
एका फुलाने झेलले माझ्या मनाचे आभाळ

ही ओळ सुचली असावी. एका फुलाने मनात चाललेली आंदोलनं झेलली. मन आणि निसर्ग वेगळे आहेत कुठे? मनाचे विभ्रम निसर्गात दिसतात आणि निसर्गाचे प्रतिबिंब मनात उमटते. निसर्गाने अनेक कविता प्रसविल्या. निसर्ग हा अनेक कवींचा, लेखकांचा स्त्रोत आहे. मग बालकवींची "हिरवे हिरवे गार गालिचे हरित तृणांच्या मखमालीचे" असो किंवा "श्रावणात घननिळा बरसला रिमझिम रेशिमधारा, उलगडला झाडांतून अवचित हिरवा मोरपिसारा..." ही कविता असो, निसर्ग हरघडीला सोबत आहेच. दुर्गाबाईंनी "ऋतूचक्र" कसा उलगडला? सांज सकाळ चे पूर्व पश्चिमेचे रंग सुखदायक वाटतात. वाऱ्याची झुळूक अपूर्व स्पर्शसुख देते. पावसाच्या सरी अजूनही कानात अनादी काळाचे गूढ कवनं ओततात. पक्षांच्या चिवचिवाट झाडाला जिवंत करतो. आपण निसर्गापासून दूर गेलो तरी निसर्ग आपला पाठपुरावा करतोच आहे.

पुढे अनिल अवचट यांची पुस्तके वाचनात आली. स्वत:विषयी, गर्द, मोर, माणसं, कार्यरत, मुक्तांगण ची गोष्ट आणि अनेक इतर. यातील कार्यरत वाचताना अनेक अवलिया लोकांची ओळख झाली. लोकं मळलेली वाट सोडून वेगळ्या वाटेने जाण्याचे धाडस करतात. वेगवेगळ्या जमातींचे प्रश्न, निपाणीच्या बिडी कामगारांची व्यथा, पारधी समाज, वडार समाज, मजूर यांना जगताना करावी लागणारी धडपड सगळं जवळून कळलं आणि आत भिडलं. मुक्तांगण संस्था तिथले दारू आणि गर्द च्या आहारी गेलेले, त्यांना मदत करणारे, त्यातून बाहेर काढणारे या सगळ्यांची साखळी. एक वेगळच जग बघायला मिळालं.

मी अनेकदा एकाच वेळी दोन किंवा तीन पुस्तके वाचलेली आहेत. आणि मग बघायचं कोणत पुस्तक आपल्याला ओढून घेतं ते? :)

मीना प्रभू यांची अनेक पुस्तके मला आवडलेली आहे. त्याचं बोट धरून मी तुर्कस्तानात गेले, इराण ला फिरले. लंडन ची सफर केली. इजिप्त ची गीझा पिरामिड्स पहिली. दक्षिण रंगात रंगले. गालापागोस बेटं पहिली. नवनवीन चालीरीती माहित झाल्या. त्या त्या स्थळाच्या इतिहासाची ओळख झाली. इटली आणि रोम ची शिल्प आणि चित्र पहिली. मायकेलअंजेलो याचं "पिएता" हे शिल्प आणि त्याचं वर्णन आजही लक्षात आहे. तसाच "द लास्ट सपर" चित्राबद्दल लोकांनी लावलेले अर्थ. कधी कधी तर परत परत वाचली. दरवेळी काही तरी नव मिळत गेलं.

पुढे दोन मुलींची आई झाल्यावर नवे विषय वाचनात आले. नील ची शाळा, समरहिल, तोतोचान, टीचर ही पुस्तके. शिक्षणावर जगभरात होणारे वेगवेगळे प्रयोग कळले. ही अनुवादित कविता मला कुठेतरी सापडली..
जर माझं मूल पुन्हा घडविण्याची संधी मिळाली तर..
मी त्याला बोटाने चूप करायचे कमी करीन,
आणि भिंतीवर रेघोट्या मारण्यास भरपूर वाव देईन
त्याला सुधारण्याच्या फंदात पडण्यापेक्षा
निरनिराळ्या छंदात गुंतवण्याचा विचार करीन
नजरेच्या धाकात ठेवण्याऐवजी
डोळसपणे त्याचे निरीक्षण करीन...

आणि खूप आवडून गेली. मग आई म्हणून मुलींना वाढवताना, नवीन आव्हानं स्वीकारताना, त्यांना सामोरं जाताना ही कविता नेहमी आठवायची. सगळ्याच वेळी ती प्रत्यक्षात उतरली असेही नाही. मुलं वाढताना आपणही घडत असतो हे जाणवलं.

वाचलेल्या पुस्तकाबद्दल कोणीशी बोलायला मिळालं की खरी मजा येते. वाचता वाचता एखादं असं रत्न हाताला लागतं कि मग असा वाटतं वा! लोकसत्तेत अच्युत गोडबोले याचं सदर कितीतरी महिने वाचलं. पुस्तक आल्यावर तर त्यावर उड्याच मारल्या. मुसाफिर, मनात, अर्थात, ननोदय, किमयागार..अबब एक एक पुस्तक म्हणजे त्या त्या विषयातला ग्रंथच! त्या महासागरात मनसोक्त डुंबले. कितीतरी गोष्टी कळायला लागल्या. एक माणूस इतकं ज्ञान मिळवू शकतो आणि त्यावर पुस्तकं लिहू शकतो...अविश्वसनीय! भारावून गेले.

प्रकाश नारायण संत यांची फक्त 4 पुस्तकं प्रकाशित झाली. शारदा संगीत, पंखा, झुंबर आणि वनवास. कर्नाटक आणि महाराष्ट्रा च्या सीमेवर राहणाऱ्या लंपन ची गोष्ट. भाषा मोठी मजेदार! ही चारही पुस्तकं या मुलाच्या भावविश्वात आपल्याला घेऊन जातात. शारदा संगीत मधला तो गायनाचा तास! आहा! असे वाटले तो क्लास शोधून त्यात सामील व्हावे. आणि ती वेगवेगळी गाणी गावी. ते प्रेमळ आजी आजोबा! "माझ ते हे ह्याच्या वर ठेवले होते ते कुठे आहे", असे आजोबांनी म्हंटल्यावर "जरा उजवी कडची मान वळवून डावीकडे न्यायचे कष्ट घ्या म्हणजे मिळतंय काय ते" असे उत्तर देणारी आजी. त्यात लंपन चे  mad मित्र, त्याची शाळा, बाबुराव च्या गमतीजमती. प्रत्येक गोष्टीतून शेवटी उलगडणारे insight फार मजा देऊन गेले.

कुठे आमटेंच्या "प्रकाशवाटा" दिसल्या. कधी "माझा साक्षात्कारी ह्रदयरोग" कळला. तर कधी नरेंद्र जाधवांचं "आमचा बाप आणि आम्ही" याचं जगणं समोर आलं. कधी "रारंगढांग" हिमालयात घेऊन गेला. विठ्ठल कामतांच "इडली आणि ऑर्किड" ची सफर वाचली. मुलींसोबत वाचताना "बोक्या सातबंडे" भेटला.

पुस्तकांनी अनेक गोष्टी सांगितल्या. मनाला पटलेली गोष्ट निर्भयपणे करत रहा असा विचार दिला. कधी नादाने रोजनिशी लिहिली. आवडलेल्या कविता जपून लिहून घेतल्या. नित्य नवीन विचारांच्या शोधात राहिले. माणसांच्या अंतरंगात डोकावायला शिकले. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करायला शिकले. लेखकांच्या, कवींच्या बाबतीत पुढील गोष्ट अगदी खरी वाटते-
        
         हम तो मर कर भी
         किताबों मे रहेंगे जिंदा
         गम उन्ही का है जो
         मर जाये तो गुजर जाते है

शिल्पा पराग 

1 comment: