सोशल मीडिया का सोसेल एवढा मीडिया
सा म्हैन्यापुर्वी जर का मला कोन म्हनालं असतं का बाई, तू सोशल मीडिया का सोसेल येवढा मीडिया ह्या इषयावर लिही तर मी त्यालाच खुळ्यात काडलं असतं. कारन सा म्हैन्यापुर्वी सोशल मीडिया म्हंजी काय ह्ये मलाच म्हाहीती न्हवतं. माज्यासाठी मीडिया म्हंजी वर्तमानपत्र अन टीव्ही. अन सोशल म्हंजी आपन घराभाहीरच्या लोकांशी गप्पा मारतुं आन त्ये बी आपल्याशी इचारंची द्येवान घ्येवान करत्यात. आन फोन वर सुदिक क्येलं तरी बी त्ये सोशलच म्हंता येईल.
पूर्वी माज्या मैतरणी आन मी येकमेकांला फोन करायचो. आन मिनिमम एक तास गप्पा मारायचो. ती तिकडून आन मी हिकडून फोनच ठिवायचो नाय. तर माजी पोरं जाम वैतागायची. आई तुज्या मैतरणी अशा कशा? येळेचं काई भानच न्हाई. मी म्हनाली कि आमचं मन रमतं, आमाला ते सोसवतं आन मानवतं बी. तुमाला त्याच्याशी काय दयेनं घ्येन? त्यात खाडा पडला तरच मला चक्कर येति. माजं त्ये सोशल लाईफ हाये.
आमचं मैतरणींचं कसं, दोगी बोलाया लागलो का तिसरीचं पार वभाडं काढायचो. वाभाडं म्हंजी तिच्याबद्दलच जास्ती बोलायचो. का ती स्वताला किती शानि समजती आन खानदानी बी समजती. आन तिचा नवरा तर न्यूटन किंवा आईन्स्टाईनच. आमाला असं स्वतःचं कवतिक करता येत न्हाई म्हनून, न्हाई तर आमच्याकडं पन सांगन्यासारखं बरंच हाये. असल्या गप्पा मारल्या का मन शुद्ध व्हायचं. समदा अशुद्ध माल भाहीर !
पन माजं पोरगं काय म्हनालं का आई तू लै गॉसिप करतीस, त्ये ओल्ड फॅशन झालं हाये. हिचं गॉसिप तिच्याबरुबर आन तिचं गॉसिप हिच्याबरुबर!
त्यान्ला कळालं तर तुझं काय बी खरं न्हाई. तुला मी सोशल मीडिया शी इंट्रोड्युस करतो. तुजा चांगला टाइम पास बी हुईल. आन आजकाल सोशल मीडिया वर नसलं तर इतर लोकं अडानी समजत्यात.
मलाबी गॉसिप करकरून कंटाळा आला हुता आन त्ये थोडं थोडं धोकादायक बी वाटाया लागलं हुतं. आन आपून कितीबी गॉसिप क्येलं तर समोरचा मानूस सुधरतो थोडाच?
त्याच्यात काड़ीचाबी फरक पडनार नसल तर आपनबी आपली फोनची बिलं का वाढवावीत?
मी म्हनलं का कर बाबा. पर मला चक्कर न्हाई येतां कामा.
तर त्यानं माजं फेस बुक वर अकाउंट ओपन क्येलं. बघती तर काय? समद्या साळकाया माळकायां थितं हजर! माज्या शाळेपासूनच्या मैतरणी आन नातेवाईक बाया पुरुष! माज्या ध्यानी मनी बी न्हवतं का असं काय आसल. त्यांच्या लाइफ मदि काय काय चाललंय मला आता घरात बसूनच कळणार! म्हंजी आंधळं मागतं येक डोळं आन द्येव द्येतो दोन! ह्ये आदी का बरं कुनाला सुचलं न्हाई? देर से आये पर दुरुस्त आये ! असंच म्हनावं लागलं.
तर कुनाला शोऑफ करायचंय, कुटं जेवाया गेले हुते, कुटं प्याया गेले हुते, कुटं गुड न्यूज हाये, कुटं बॅड न्यूज हाये, काय शॉपिंग क्येलं, कुटं वेकेशन ला गेले हुते, फॉरीन ला का कुटं? आजून प्रमोशन मिळालं, अवॉर्ड मिळालं, पोरगं पास जालं, लेक नोकरीला लागली असं काय काय! रांगोळ्या काढल्या, चारोळ्या लिहिल्या, ड्रॉईंग काढलं, लेख लिहिला, विडिओ काढला, मुंगी असुदे न्हायतर डायनासोर, चांगला मानूस असुदे न्हाहीतर टेरोरिस्ट सगळं हितं हाईच! जर तुमाला आवडलं तर तुमी लाईक करा. चांगली कॉमेंट करा. न्हाही तर उलट अंगठा दाखवा, खराब कॉमेंट करा. वाढदिवसाच्या अनिव्हर्सरी च्या शुभेच्छा द्या न्हाहीतर काँग्रॅजुलैशन करा! तर मार्क झकेरबर्ग नि लोकांची मोटीच सोय केली. ह्याला म्हनतात जिनिअस! मला जनरली असं दिसून आलं का सोशल मीडिया हा समुद्रा पेक्षा खोल, आकाश येवडा मोठा, वाऱ्यापेक्षा फास्ट आन दाही ही दिशांना पसरलेला हाये. ह्याचा आवाका महाभारता पेक्षा बी जबरदस्त हाये. पाताळलोक, भूलोक, स्वर्गलोक ह्यांना पुरून उरनारा हाये. थोडक्यात सांगायचं म्हंजी मी लैच इंप्रेस झाली.
आता माजा कॉन्फिडन्स बी वाढला, म्हटलं बगु तरी थोरल्या वन्संचं काय चाललय? मला लैच अक्कल शिकवीत असत्यात. ह्ये बरं न्हाई आन त्ये बरं न्हाई. असं करू नये आन तसं वागू नये. बगती तर काय? त्यांनी गुलाबजामून क्येलं हुतं आन चमच्यानी खातानचा त्यांचा फुटो! आन धाकल्या वन्सं, मोठ्या जाऊबाई आन कोनि कोनी साळकाया माळकाया नी लाईक क्येलेलं! आन कॉमेंट म्हंजी, वॊव, यम्मी, तोंडाला पानी सुटलं, रेसिपी पाहिजे ,ह्यव आन त्यंव!
आता ह्याला काय म्हनावं? कर्म न दशा? ह्या बाईला शुगर हाये, ती गुलाबजामून खाती आन समद्या लाईक करत्यात? जगात प्रामानिक पना राहिलेला न्हाई!
माजी धाकली भावजय बी लै नटवी हाये. तिनं आपला फुटो टाकला हुता. स्कर्ट मंदी!
तर तिला लोकांचं बरच लाईक मिळालं हुतं. आन कॉमेंट खालील प्रमाने, वॊव, लै बारीक दिसतीस, अगदी करीना कपूर, साईझ झिरो का? डाएट कुनाचं फॉलो करतीस? मानलं बुवा! ह्यव आन त्यव!
तिनं काय म्हनावं? "थॅंक्स टू ऋजुता दिवेकर!" ह्याचा काय अर्थं घ्यायचा शान्या मानसाने? तुज्या ऐवजी ऋजुता दिवेकरिनच डाएट करीत हुती का?
मला कॉमेन्ट टाकण्याची लै सुरसुरी आली हुती, का बाई काल तू माज्या हितं बसून दोन प्लेट खिचडी आन चार पेढं उपास म्हनून हादडलं हायेस. पन सत्याचा वाली कोन? मग मी न्यूट्रल स्टॅन्ड घ्यायचा ठरवीला! लाईक बी नगं आन डिसलाईक बी नगं.
माज्या ओळखीची लोकं फॉरीन ला जात हुती येत हुती. लाईफ एन्जॉय करीत हुती. त्यांच्या पार्टीज चालू हुत्या. समदं सिनेमावानी चालू हुतं. आनंदी आनंद हाये असं पिक्चर दिसून येत हुतं. मी सगळं लाइटली घेत हुती.
टपरी वर च्या प्यायला, भुसनळे बुद्रुक ला जात हुतो, वाटेत बस फेल झाली, लेकाचं काई खरं न्हाई, नीट अभ्यास करीत न्हाई, लेकीचा समदा वेळ आरशासमूर जातो असं काय बी लोकं सोशल मीडिया वर घालीत न्हवती. मी न्यूट्रल बनत चालली हुती. चक्कर येनं बंद पडलं हुतं.
तर माजं पोरगं म्हनालं का आई मला तुजा लै अभिमान वाटत हाये. आता मी तुजं ट्विटर अकाउंट हुगडतो. म्हनलं तुजा फाजील पना बास झाला.
तिथं मला कुनी फॉलो केलं म्हंजी? तुज्या पप्पाना त्ये बिलकुल आवडनार न्हाई. त्ये लै पझेसिव्ह हायेत. आता त्ये ट्विटर आनी कुटं हॅन्डल करू? आन मी काय रागा हाये का नमो? आन कुणी हॅक क्येलं म्हंजी? त्ये कसं निस्तरावं?
सोशल मीडिया चा पेडा खावाच पन तो सोसेल येवडा !!
- नेहा भदे
Hilarious ... Just too good !
ReplyDeleteमस्त.हसून हसून पुरेवाट.
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteI laughed until I cried! Witty. Hilarious. Genius!
ReplyDeleteSuper hilarious article, had lots of fun while reading. Always enjoy your articles. Keep up the good work!!
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteSuperb and mind blowing!
ReplyDeleteHa Ha Ha...Lai Bhari ;)
ReplyDelete