अहवाल : चित्रांगदा


 मित्रमंडळाच्या गणेशोत्सव कार्यक्रमात शुक्रवार, १४ सप्टेंबर २०१८ ला एक आगळा वेगळा नृत्याविष्कार बघण्याचा योग आला. रवींद्रनाथ टागोर यांनी मूळ बंगाली मध्ये लिहिलेले ‘चित्रांगदा’ हे काव्य ‘गंधर्व कला केंद्र’च्या संस्थापिका अर्चना बक्षी यांना बरेच दिवस खुणावत होते. त्याचे मराठीत संस्करण करून, त्यावर गाणी, नृत्य याची अंगड टोपडी घालून गेले सहा महिने त्यावर अथपासून इतिपर्यंत मेहेनत घेऊन ही नृत्यनाटिका त्यांनी साकार केली. गंगाराम गवाणकर यांचे मराठी रूपांतर, अर्चना बक्षी यांचे दिग्दर्शन, प्रवीण दवणे यांची गीतरचना, विजय तांबे आणि प्रदिप्तो सेनगुप्ता यांचे संगीत, संजीवनी भेलांडे, माधुरी करमरकर, शर्मिष्ठा बासू आणि मंदार आपटे यांचे पार्श्वगायन यांनी त्याला साजिरे रूप दिले. या कलाकृतीला तिहाई, तुकडे आणि यमन तराणा याचे संगीत संयोजन व नृत्यदिग्दर्शन दस्तुरखुद्द पंडित बिरजू महाराज यांचे लाभले होते.

महाभारतात अर्जुनाचे त्याच्या वनवासामधल्या काळात मणिपूर राज्याची राजकन्या चित्रांगदा हिच्याशी लग्न होते. अर्जुन आणि चित्रांगदा यांची प्रथम भेट, नंतर एकमेकांवर जडलेली प्रीत यामागची गोष्ट या नृत्यनाटिकेमधूनसादर केली आहे. अर्जुनाचा करारीपणा, चित्रांगदा भेटल्यावरचे त्याचे लुब्ध होणे प्राची देवधर हिने तिच्या देहबोलीतून सुरेख दाखविले आहे. राज्याची रक्षणकर्ती शूर योद्धा आणि स्त्री सुलभ भावना असलेली सौंदर्यवती अशा ‘चित्रांगदा’ या व्यक्तिरेखेच्या दोन्ही बाजू रश्मी डहाळे आणि मानसी फडके यांनी व्यवस्थित आपल्यासमोर मांडल्या. 
मदन आणि वसंत यांच्या मदतीने झालेल्या कायापालटाचा क्षण चांगला दाखविला आहे. अपर्णा चेरेकर हिचा ‘मदन देव आणि वैशाली आकोटकर हिचा ‘वसंत ऋतू’ यांचे स्टेजवरचे वावरणे सहज होते. त्यांना पाहून, आपल्याही आयुष्यात मदन आणि वसंत यांचे कधीतरी आगमन व्हायला हवे अशी खुशखुशीत इच्छा प्रेक्षकात बसलेल्या काही मैत्रिणींच्या बोलण्यातून व्यक्त झाली. स्टेजवरच्या इतर नृत्यांगनांनी सख्या, सैनिक या भूमिकेमध्ये योग्य ती साथ दिली. संपूर्ण कार्यक्रमाचे ध्वनिमुद्रण पात्रांनी त्यांच्याच आवाजात केले होते. बिगर मराठी नृत्यांगनांचे ध्वनिमुद्रण मात्र सदोष होते. 

शिवपिंडीवरची पाण्याची संतत धार, घनदाट अरण्य असे आकर्षक नेपथ्य होते. देखण्या वेशभूषेमुळे नृत्याविष्कार रंगतदार झाला. एकूणच सर्वांनी घेतलेली मेहनत दिसून येत होती. ‘मित्रमंडळ’ मधल्या मैत्रिणींना या वेगळ्या रूपात वावरताना बघून मजा आली. एकूणच हा नृत्याविष्कार वेगळा होता. अर्चना ताई यांचे आभार की एक वेगळी कलाकृती त्यांनी सादर केली आणि मित्रमंडळाचे आभार की अशी कलाकृती आम्हाला पहायला मिळण्याची संधी उपलब्ध करून दिली.

रुपाली गोखले 


2 comments:

  1. Wah Rupali khup chhan lihile ashes.

    ReplyDelete
  2. Khup mast, this gives an idea of what I missed by not watching this program.

    ReplyDelete