पोहे

जूनच्या सुट्टीत आम्ही मुलांना घेऊन बँकॉकला चाललो होतो. जायच्या दिवशी सकाळी घरी पोहे केले होते. मी मुलांना सांगितले की मनसोक्त पोहे खाऊन घ्या. तिकडे आठवडाभर मिळणार नाहीत. दुसरे दिवशी हॉटेलच्या ब्रेकफास्ट बुफेमध्ये पोहे होते...!! मला अशोक वनात सीतेला हनुमान भेटल्यावर झाला असेल तसा आनंद झाला. खरेच! पोहे हा विलक्षण पदार्थ आहे. महाराष्ट्रीय घरात हमखास केला जाणारा!

रविवारच्या सकाळी टेबलवर चहाच्या सोबतीने येणारे गरमागरम चमचमीत वाफाळते  कांदेपोहे. त्यांच्याबरोबर त्यांच्या जिवलग मित्र मैत्रिणी- खोबरं, कोथिंबीर आणि लिंबाची फोड. बस! ही चौकडी जमली की सुरू होते रविवारची प्रसन्न सकाळ. कधी कधी बरोबर शेव/ लोणचे/ दाण्याची चटणी/ फरसाण अशी पाहुणे मंडळी असतील तर मग खाशी मैफिलच जमते त्यांची.

तर अशा ह्या पोह्यांचा महिमा काय वर्णावा? एक तर त्यांची लोभस विविध रूपे... कांदे पोहे, बटाटे पोहे, मटार पोहे, कोबी पोहेपासून ते दडपे पोहे, कोळाचे पोहे, दही पोहे, दूध पोहे ही सर्वच रूपे गोजिरवाणी! प्रत्येकाची लज्जत निराळी! हेच पोहे कधी जर मिसळीमध्ये मिसळले गेले तर तिथेही उसळ, फरसाण, कांदा, लिंबू याच्याशी मिळून मिसळून मिसळीची लज्जत वाढवतात!

एरवी रोजच्या नाश्त्याला असणारा पोहे नावाचा प्रकार चिवड्याच्या रूपात आला की त्याची रवानगी थेट दिवाळीच्या पहिल्या शाही फराळाकडे होते.

पोहे हा माणसांचाच नाही तर देवांचाही आवडता नाश्ता आहे. सुदाम्याने श्रीकृष्णासाठी पोहेच नेले होते आणि ते कृष्णाने आवडीने खाल्ले होते. नाही का? जिथे देवाधिदेव पोहे खातात तिथे आम्हा पामरांची काय कथा?

पोह्यांवर एक महत्त्वाची जबाबदारीदेखील असते. विचारा कसली? तर अरेंज्ड मॅरेज जमवण्याची! आपल्याकडे बरेचदा मुलगी पसंत करणे  प्रकाराला चहा आणि ‘पोहे’ असतात सर्वसाधारणपणे! पोह्यांच्या चमचमीतपणावरून लग्ने ठरू शकतात!  तर असा हा पोहे नावाचा पदार्थपचायला ‘हलका असला तरी लोकांची लग्ने जमवण्याची क्षमता असणारा म्हणून त्याचे समाजात पारडे ‘जड!

मला लहानपनापासून पोहे फार आवडतात. लहानपणी घरी रोज नाश्त्याची पद्धत नव्हती. फक्त रविवारी पोहे असायचे, त्यामुळे त्याचे फार अप्रूप वाटायचे. रविवारी सकाळी लागणारी रंगोळी आणि त्या पोह्यांसाठी रविवारची वाट बघायचो आम्ही. मला पोहे एवढे आवडायचे की मी तर गाण्यात देखील त्यांचा उल्लेख करत म्हणायची :

आकाश पांघरूनी जग शांत झोपलेले!

घेऊन एक वाटी खातो कबीर पोहे!!

घरच्या सात्विक पोह्यांची सवय कॉलेजमध्ये जड तर जाणार नाही ना असा विचार मनात येईतो कॉलेजच्या बाहेर टपरीवर पोहे मिळतात असा शोध लागला. तोवर घराच्या बाहेर कधी पोहे खाण्याचा प्रश्न आला नव्हता. टपरीवरचे पोहे नावासारखेच टपरी नसतील ना, असा एक विचार डोकावून गेला. पण पहिली बशी डोळ्यासमोर आली आणि ती शंका दूर  झाली. टपरीवर पोहेउपमा-साबुदाणा खिचडी असे सर्व प्रकार मिळायचे. आणि या सर्वांचे जिवलग साथीदार म्हणजे बटाटेवडा आणि पातळ हिरवी चटणी. शिगोशीग भरलेल्या पोह्यांवर टपरीवाला एक बटाटेवडा ठेवून त्यावर पातळ चटणी ओतायचा. भन्नाट कॉम्बिनेशन. बटाटेवड्याचा तेलकटपणा पोहे शोषून घ्यायचे आणि अजूनच मऊसूत व्हायचे आणि हिरवी चटणी वेगळाच चटकदारपणा आणायची. त्या अद्वितीय पोह्यांनी कॉलेजची वर्षे सुरळीत पार पाडली. असो!

इतकेच काय, आपल्या अवधूत गुप्ते काकांनी तर ‘आयुष्य हे चुलीवरल्या कढईतले कांदेपोहे’ हे धम्माल कॅची चालीचे गाणे रचून पुराणकाळात देवाधिकांना आवडणाऱ्या पोह्यांना आत्ताच्या मॉडर्न युगातदेखील ग्लॅमर मिळवून दिले! या गाण्यात गीतकाराने आयुष्याला पोह्याची ‘उपमा’ दिली आहे.

तर असे हे रुचकर पौष्टिक पोहे! नुसते डोळे मिटून मस्त खोबरे, कोथिंबीर भुरभुरलेल्या पोह्यांच्या बशीचे चित्र डोळ्यासमोर आणून बघा. मग त्या चित्रात ‘शिरा’ आणा. तुम्हाला जाणवेल की त्या आनंदाला ‘अद्वितीय’ सोडून दुसरी ‘उपमा’ नाही. आणि मग त्या आनंदाच्या डोहात मनसोक्त ‘पोहा’

-विनया रायदुर्ग


2 comments: