वादळ असे परतवून लावले...

एका स्थानिक डॉक्टरांचा स्टेथोस्कोप माझ्या हृदयाचे ठोके ऐकत होता. मधूनच त्यांच्या कपाळावर चढणाऱ्या आठ्या पाहून माझ्या हृदयाचे ठोके वाढतच होते. शेवटी एक दीर्घ श्वास आणि मोठा आवंढा गिळून त्यांनी तोंडी निदान केलं, “इमीजिएटलि यू रिक्वायर अ व्हॅल्व्ह् रिप्लेसमेंट... हो, तुमच्या हृदयाची एक झडप तातडीने बदलावी लागेल, पण फॉर कॉन्फर्मेशन, टूडी इको करून घ्या.” या वाक्याच्याच गतीने आम्ही पुणे गाठले. चकचकीत इमारतीत मलीन अंतःकरणाने शिरलो आणि पुन्हा रंगीबेरंगी गुळगुळीत रिपोर्ट घेऊन सैरभैर होऊन बाहेर पडलो. हो सिव्हिअर रिगरजिटेशन (regurgitation).  एका झडपेतून रक्त पुन्हा उलटं हृदयात जात होतं. कार्डीऑलॉजिस्टने स्पष्ट बजावलं, तुमच्या हातात खूप कमी वेळ आहे. काय ते लगेच ठरवा. त्यांना हो म्हणून सौ, मी आणि आमचा लहान मुलगा हॉस्पिटलच्या दारातच क्षणभर बसलो. आमची ही उद्विग्नता येणारेजाणारे पहात होते. हरलेल्या विचित्र मानसिक अवस्थेत घरी आलो. निर्णय घेतला आणि मुंबई गाठली. 

बॉम्बे हॉस्पिटलमध्ये डॉ. सक्सेना  हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आणि इंडिअन आर्मीचे सर्जन मला तपासत होते. ‘’ताबडतोब सर्जरी करावी लागेल चटकन अॅडमीट व्हा...” त्यांनी स्पष्ट केले. यावर मी बालिशपणे, “डॉक्टर, नुसत्या औषधांनी बरं नाही होणार का?” असा आशावादी प्रश्न विचारला. त्यावर स्मित करत ते म्हणाले, “दाराची फळी तुटली की ती पुन्हा उगवून येत नाही. सुताराकडून नवीन बसवून घ्यावी लागते. आणि नाही बसवली तर उघड्या दारातून प्राण पळून जाईल. नाही का?” बापरे! प्राणाची ही प्रवृत्ती ऐकून मनाला मोठ्ठा धक्का बसला. मी घाबरून जाऊ नये, मला हे संकट पेलता यावं आणि वस्तुस्थितीची जाणीव व्हावी म्हणून डॉक्टर मिश्किलपणे बोलत होते. ठरले! उद्या सकाळी आठ वाजता ऑपरेशन. मी पुरता घाबरलो. मला दिलेल्या रूममध्ये मनातल्या मनात रडत होतो. उद्या मी ‘टू बी ऑर नॉट टू बी’ चालू सायकलची चेन बदलायची... हृदय थांबता कामा नये... ओपन हार्ट सर्जरी. यापूर्वी अशा दिव्यात दगावलेल्या व्यक्ती डोळ्यासमोर दिसू लागल्या. पण आता इलाज नव्हता. आज जीवनाचा शेवटचा दिवस किंवा पुन्हा आरंभ, एक काहीतरी होणार... रूमबाहेर येरझाऱ्या घालू लागलो. व्हरांड्यात बाकावर बसलो. तिथं एका जुन्या पेपरचं पान पडलं होतं. मी उचललं. कारगिलच्या युद्धातील शहीद जवानांची बातमी आणि विजयाचा तिरंगा फडकतानाचा फोटो. क्षात्रतेजाने माझे रक्त सळसळू लागले. अत्यंत बलदंड, निरोगी, सुदृढ युवक आपल्या तारुण्याच्या उंबरठ्यावर माझ्यासारखे दुर्बल रोगी जगविण्यासाठी, सामन्यांच्या सुरक्षिततेसाठी आपला तरुण तरतरीत प्राण देतात आणि आम्ही केवळ स्वतःसाठी जगण्याचा केवढा संघर्ष करतो. पेपर उराशी कवटाळून मी हसायला लागलो. मिळाली... मला मनःशक्ती मिळाली! ऑपरेशनपूर्वीच मी जिंकलो. या युद्धाच्या बातमीनं मला केवढं बळ मिळालं. आनंदानं सरळ कानात इअरफोन घालून गाणी ऐकत बसलो.
युद्धाचा दिवस उजाडला जय्यत तयारी झाली. माझा स्ट्रेचर ऑपरेशन थिएटरच्या दारात आलं. स्वर्गाच्या दारातून तमाम नातलगांना टाटा केलं आणि चाकं हलली. बाहेरचा रक्ताच्या थेंबासारखा लालबुंद दिवा पेटला आणि भूल दिलेल्या माझ्या निद्रिस्त शरीराचा हिरव्यापांढऱ्या डगल्यातल्या देवदूतांनी ताबा घेतला. शस्त्रे चालू लागली आणि थांबली. डोळे उघडले तेव्हा मी अतिदक्षता विभागात. शरीरभर विविध रबरी नळ्या, वायर्स, तोंडात ऑक्सिजनचा मास्क असा एखाद्या रोबोसारखा पडलेलो. नवजात अर्भकासारखे मी डोळे किलकिले करून पहात होतो. पत्नीच्या चेहऱ्यावर विजयाचा तिरंगा फडकत होता.

पण हा आनंद फार काळ टिकला नाही. माझी म्हणावी अशी रिकव्हरी होत नव्हती. तीन दिवसांनी मला उभे केले आणि मी पुन्हा कोसळलो. नवी झडप काम करत नव्हती. पळापळ झाली. डॉक्टरांना जाब विचारला. ते म्हणाले, “असं अगदी रेअरली घडतं. व्हॅल्व्ह् रिओरीएंटेशन करावे लागेल. आणि हा प्रयोग आहे. आम्ही प्रयत्न करू. बाकी नशीब तुमचे.” पुन्हा भली मोठी रक्कम उभी केली. रक्तदाते तयार केले आणि लगेचच युद्धपातळीवर दुसरे ऑपरेशन केले. पण या वेळी माझे डोळे उघडले नाहीत. झडप नीट हलेना. शेवटी जांघेतील मोठ्या शिरेतून (Artery) एक मोठा बलून हृदयाजवळ सोडला. हा फुगा फुगला कि हृद्य हलायचे, असे चार-पाच दिवस चालू होते. या अनाकलनीय स्थितीत मी इंद्राच्या दरबारात बसलो होतो, पण तिथे कोणीच माझ्याशी बोलत नव्हते. मी असे का विचारले तेव्हा देवगण म्हणाले, “अजून तुझे नक्की नाही. बहुतेक मानव तुला तिथेच ठेवेल, कारण तुझ्याकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत.” आणि मी डोळे उघडले. समोर डॉक्टर आणि सर्जिकल अॅटॅकवाले आनंदाने टाळ्या वाजवत होते. आणि मी माझ्या मनोधैर्याचा विजय साजरा करत होतो. एक तप झाले, आता हा योद्धा रोजच्या जगण्याच्या धावपळीशी तुमच्यासारखाच लढतो आहे.


---लक्ष्मीकांत रांजणे

1 comment:

  1. सर्वांना स्फूर्ती देणारा अनुभव! सांगण्याची पद्धतही फार छान.अभिनंदन रांजणे सर!

    ReplyDelete