ज्ञानेश्वरी वाचताना


“मागच्या वर्षी कैलास ट्रीप केलीत... आता या वर्षी काय?” – अधूनमधून हा प्रश्न माझ्या ओळखीतल्या कुणाच्या डोक्यात असतो. जसं काही चार आठवड्यांची सुट्टी नेहेमीच मिळायला मी माझ्या बॉसचा फेवरीटच आहे! चार आठवड्यांची कैलास परिक्रमा शारीरिक, मानसिक क्षमतेची परीक्षा पाहणारी होती. पण एक बैठा उद्योग डोक्यात कित्येक दिवस होता – आणि पूर्वी एकदा तो अर्धवट सोडावा लागला होता. बंगलोरच्या ट्रॅफिकमध्ये अडकलो असताना एकदा वाटून गेले होते की असे अडकलो असताना ज्ञानेश्वरी ऐकायला छान वाटेल! ९००० ओव्या आहेत म्हणतात – ऐकायला एक ७, ८ तास तर नक्कीच लागतील. आता मला ८ तास ट्रॅफिकमध्ये अडकायची इच्छा नव्हती – पण तुकड्यातुकड्याने ऐकली असती.

     मग इन्टरनेटवर शोधाशोध केली. फारसे काही मनासारखे मिळाले नाही. मीनल म्हणाली, तूच का नाही करत रेकॉर्ड? नाहीतरी गेली काही वर्षे मीनल आणि मी बरीच मराठी पुस्तके रेकॉर्ड करतो आहोत – आमची ती म्हातारपणाची  तयारी आहे (आणि त्या निमित्ताने मराठी उच्चारही सुधारतात!)  कल्पना छानच होती. सगळी जमवाजमव करून विठुरायाचे मनोमन स्मरण करून सुरुवातही केली. पण अजिबात तयारी नसताना, केवळ TVवरचे कार्यक्रम पाहून डोंगर चढायला  गेल्यावर होईल तशी अवस्था झाली. हातात घेतलेले काम फारच मोठे आहे याची जाणीव लगेचच आली. ज्ञानेश्वरी वाचताना, गीतेतले श्लोक म्हणणे आवश्यकच होते! आणि केवळ गीता म्हणण्यासाठी लोक क्लासला जातात, महिनोंमहिने तयारी करतात याची कल्पना नव्हती. फक्त ओव्या म्हणायच्या का त्यांचा अर्थ पण वाचायचा? अर्थ महत्त्वाचा वाटला, पण त्यात मूळ ज्ञानेश्वरी वाचायच्या लयीत खंड पडत होता. पण तरी नेटाने दोन अध्याय वाचले – मग प्रयत्न सोडला. एकूणच भट्टी जमली नव्हती.

याला झाली आता दोन वर्षे. प्रयत्न अर्धा सुटल्याचे दु:ख होते – पण बऱ्याच चुका कळल्या होत्या. मनात काही आडाखे तयार होत होते. फक्त एखादा ट्रिगर हवा होता. पण एकूण हा प्रकल्प बाजूलाच गेला होता. ‘आयुष्यात करायच्या राहून गेलेल्या गोष्टी’ या सदरात (आणखी!) एक गोष्ट जमा होणार असे वाटू लागले.

     दरम्यान, आमचा पुस्तकं वाचायचा उपक्रम चालूच होता. कैलास ट्रीपसाठी एक व्होईस रेकॉर्डर मी घेतला होता. त्यामुळे पुस्तक रेकॉर्ड करायला कम्प्युटर पाहिजे ही गरज संपली होती. पण ज्ञानेश्वरी वाचन चालू करायचा धीर नव्हता. अशात आमच्या इन्जिनिअरिन्गच्या वर्गमित्रांचा whatsapp ग्रुप तयार झाला – त्यात सुरुवातीच्या उत्साहात कोण काय करतय, काय छंद आहेत, वगैरे माहिती सांगत असताना, माझी त्या वेळची क्लासमेट –अपर्णा गानू – आता गोगटे – हिने गीता पठण स्पर्धेत काही बक्षीस मिळवल्याचे सांगितले. आणि एकदम ज्ञानेश्वरी परत खुणावू लागली. गीतेतले श्लोक कोण देणार हा प्रश्न संपला. उत्साहात तिला फोन केला. आता गेल्या तीस वर्षांत आमची भेट नाही, पण तिने केवळ माझ्या फोनवरच्या आवाजावर विश्वास ठेवत, श्लोक रेकॉर्ड करून पाठवायचे मान्य केले, आणि पाठवलेही! मी ज्ञानेश्वरीत हे श्लोक योग्य त्या ठिकाणी आणलेले आहेत – पण फक्त गीताध्यायाचा एक वेगळा अल्बम केला आहे. अत्यंत सुरेल आवाजातले, सुस्पष्ट, शुद्ध मराठी उच्चारातले हे गीतापठण ऐकणे हा एक सुखद अनुभव आहे. एकूण साडेतीन तासांच हा गीतापाठ, संस्कृत श्ब्दोच्चारांचा एक उत्तम धडा आहे.

     मागे एकदा धक्का खाल्ल्याने, या वेळी जरा तयारी केली. अर्थ वाचायचा नाही असे ठरवले. एक दोन, ट्रायल रेकॉर्डिंग करून ते ऐकून पाहिले. ज्ञानेश्वरीच्या ओव्यांची एक लय डोक्यात होती. ती मोठ्याने वाचून पक्की केली. (तरीसुद्धा – बऱ्याच ठिकाणी ऐन वेळी त्रेधा उडालीच!). ऑडिओ एडिटिंगसाठी सॉफ्टवेअर डाऊनलोड केले. त्याच्याशी खेळून पाहिले. असा बराच जामानिमा करून, विठूरायाला मनोमन आणि घरच्या देवांना आणि आईला प्रत्यक्ष नमस्कार करून –“ओम नमोजी” ने सुरुवात केली. ९००० ओव्यांचा पल्ला होता – पण पहिली ओवी कधीतरी म्हणणे भाग होते, ती सुरुवात केली. दररोज एखाद दोन तास वेळ काढत नेटाने वाचन चालू ठेवले. शनिवार, रविवारी जरा जास्त – असे करत – सहा आठवड्यांत १७ अध्याय वाचून झाले – १८ व्याला मात्र २ आठवडे लागले.

     एकदा वाचायची लय सापडल्यावर लक्षात आले – की साधारणपणे एका मिनिटात ५ ओव्या म्हणून होतायत. आणि तासाभरापेक्षा जास्त एका वेळी वाचले की आवाजावर परिणाम होतोय. मग एका वेळी एक तास ही मर्यादा ठेवली. पण त्याचा परिणाम म्हणून दर पन्नास मैलांवर भाषा बदलावी तसे दर तासाभराने आवाजात फरक आलाय. अर्थात स्टुडिओमधले काम नसल्याने हे अपेक्षितच होते. वाचताना कधी खोकला आला किंवा विमान, अँब्यूलन्स जायला लागली की तेवढ्या वेळेपुरते मी रेकॉर्डर पॉज करायचो. एकदा तो परत चालू करायला विसरलो. त्या अध्यायाच्या सगळ्या ऑडिओ फाइल्स एकत्र करताना ते लक्षात आले. साधारणपणे ५० ओव्या गाळल्या गेल्या होत्या. मग त्या लगेच रेकॉर्ड केल्या. मधल्या काळात मला जरा सर्दी झाली होती. ज्ञानेश्वरांनी रेड्याकडून वेद वदवून घेतले, आता कोणी मी वाचलेल्या त्या पन्नास ओव्या ऐकल्या तर त्यांना वाटेल,  ज्ञानेश्वरांनी  रेड्याकडून ज्ञानेश्वरीसुद्धा वदवून घेतली असावी.

     एकूण सुमारे ३२ तासांचे रेकॉर्डिंग झाले. ऑडिओ एडिटिंग हे प्रचंड वेळखाऊ असते. त्याचे बाळंतपण बरेच करावे लागते.. मी साधारणपणे एक तास वाचून एक ऑडिओ फाईल तयार करायचो. जिथे श्लोक असेल तिथे वाचताना ३-४ सेकंदांची गॅप द्यायचो. अपर्णाने गीतातले श्लोक पाठवलेले असत; ते एक एक करून मी केलेल्या रेकॉर्डिंगमध्ये टाकायचो – प्रत्येक वेळा त्याच्या आजूबाजूचा भाग ऐकायचा – जेणेकरून श्लोक योग्य त्या ठिकाणी टाकला केला जाईल. काही वेळेला रेकॉर्डिंगमध्ये गाळले गेलेले भाग यामुळे लक्षात यायचे. हे झाले की – ते सगळे रेकॉर्डिंग परत बघून काही ठिकाणी आवाज वाढवायचा, काही ठिकाणी कमी करायचा. एका श्वासात एक ओवी म्हटल्यामुळे ओवीचा शेवटचा भाग सुरुवातीला अगदी हळू आवाजात यायचा. आणि हे प्रत्येक ओवी बघून करावे लागले. हे झाले की मग noise reduction करून ते रेकॉर्डिंग ‘स्वच्छ’ करायचे. तुकड्यातुकड्यांनी असा एक अध्याय जमवायचा. मग त्या अध्यायाच्या सुरुवातीला आणि शेवटी सतारवादनाचा एक तुकडा टाकायचा. ही फाईल वेगळी ठेवून द्यायची. आता परत ऐकताना जर काही गडबड आढळली तर मला एडिट करता येइल. सगळ्यात शेवटी – सबंध वेळासाठी एक तानपुऱ्याचा साथीचा तुकडा टाकायचा. हेच सगळे गीतेच्या अध्यायांसाठीसुद्धा! साधारणपणे – एक तासाच्या रेकॉर्डिंगसाठी आम्हाला (मी आणि मीनल मिळून) सव्वा तास वेळ हे इतर सगळे करायला लागायचे.

     हे सर्व करण्यासाठी मला मदतीची आवश्यकता होतीच. सर्वात महत्त्वाची मदत बायकोची – मीनलची. तिच्या प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष प्रोत्साहानाशिवाय हे अशक्यच होते. मी वाचायला लागलो की घरात एखादे लहान मूल बऱ्याच प्रयत्नांनंतर झोपल्यावर जशी दहशत असते तशी परिस्थिती असायची. माझा तो रेकॉर्डर बारीकसारीक आवाजही पकडतो. तेव्हा घरातले इतर उद्योग शक्य तितक्या शांततेत करणे भाग होते –हे घरातल्या सगळ्यांच्या (अगदी मोलकरीणसुद्धा) सहकार्याशिवाय अशक्यच होते. सुरुवातीला मी तासभर ज्ञानेश्वरीपुढे आणि मग सव्वा तास कॉम्प्यूटरपुढे बसतोय हे बघितल्यावर, मीनलने वाचलेल्या भागांचे वर सांगितलेले बाळंतपण स्वत:च चालू केले. मला वाटते की तिसऱ्या अध्यायापासून हे काम बहुतांश तिनेच केले. जवळजवळ निम्म्या अध्यायांचे ‘सारांश’ही तिनेच वाचले. मी रिकामा बसून टीव्ही बघत असलो की मला ‘त्यापेक्षा ज्ञानेश्वरी वाच’ असे म्हणून टीव्ही पुढून हाकलले. कित्येक वेळा मी वाचत असताना म्यूट करून पिक्चर बघितले! या परमार्थात तिने थोडा स्वार्थ केलाच. मी वाचतोय या नावाखाली नको असलेले फोन टाळले J टीव्ही चा रीमोट  आपल्याच हातात ठेवण्यात ती यशस्वी झाली. असो! अपर्णा – माझी मैत्रीण – तिने गीता वाचून पाठवली आणि या माझ्या उद्योगातला एक फार मोठा अडसर दूर केला. तिचे आभार मानावे तेवढे थोडेच. निनाद जोशी – आमचा शेजारी – त्याने सतारीवर मला पाहिजे तसे तुकडे प्रत्येक रेकॉर्डिंगच्या सुरुवातीला आणि शेवटी टाकायला दिले. त्याचेही आभारच आहेत.

     शेवटी हे सगळे कशासाठी हा प्रश्न उरतोच. आणि यातून मी काय मिळवले हासुद्धा. मी मराठी आहे, त्यामुळे ज्ञानेश्वरांबद्दल माहिती आहेच. ज्ञानेश्वर, त्यांचे चरित्र, त्यांची एक तत्वज्ञ, एक कवी, संत म्हणून असलेली प्रसिद्धी हा शाळेत शिकवलेला भाग आहे. थोड्या मोठेपणी, पंढरीच्या वारीतल्या वारकऱ्यांच्या त्यांच्यावरच्या प्रेमाचे दर्शन झाले होते. गावात आलेल्या कीर्तनकारांकडून त्यांनी मांडलेल्या विचारांवरची विवेचने ऐकली आहेत. एकंदरीतच – ज्ञानेश्वर म्हणजे थोरच – हे इतक्या वेगवेगळ्या प्रकाराने बिंबवले गेलेले आहे, की तो विचार काही विचार न करताच मी मान्य केलेला होता. ज्ञानेश्वरी वाचायला घेतली ती या पार्श्वभूमीवर. वाचायला सुरुवात केल्यावर त्यांचे महत्व ‘लक्षात’ यायला लागले. ते महान होते हे माहिती होतेच– पण आता त्यामागचे कारण जरा समजायला लागले. अर्थात, एकदा ज्ञानेश्वरी वाचून, मला ज्ञानेश्वर कळले असे म्हणण्याचा मूर्खपणा मी करणार नाही. पण साखर गोड असते हे माहिती असणे वेगळे आणि साखरेचा कण जिभेवर पडल्यावर येणारा ‘आहा’ अनुभव वेगळा.

     या माणसाच्या प्रतिभेचे कौतुक करू नये – ते प्रत्यक्ष अनुभवावे. ओवी हा वाड्मय प्रकार त्यांनी ह्या ग्रंथासाठी निवडला. ओवीत पहिले तीन चरण यमकात असावे लागतात. ९००० ओव्या. प्रत्येक ओवीत हे साधायचे. बरं विषय तत्वज्ञानाचा – ग्रंथ प्रकार टीकेचा. म्हणजे श्लोकाचा फक्त अनुवाद करून थांबायचे नव्हते. मूळ विचार विस्तारून, त्यातल्या अर्थपदरांना उलगडवत; त्या विषयाचा स्वत:चा अभ्यास मांडत, तो पुढे न्यायचा. हे करताना काव्याचे भान ठेवायचे. ज्ञानेश्वरीत काही श्लोकांचे विवरण करताना ज्ञानेश्वर महाराज, एखाद्या मैफिलीत सुरेख आवाज लागला की एखादा कसलेला गवई जसा राग आपल्या सुरांनी फुलवतो; तसे वाटते. काही श्लोकांवर २००, सव्वा २०० ओव्यांचे निरुपण आहे. वेगवेगळ्या दृष्टांतांची उधळण आहे. मोठी बहार आहे. अत्यंत ओघवत्या शैलीत एका मागोमाग एक विचार येताहेत. वेगवेगळे दृष्टांत. अणू, परमाणू ते सागर, अवकाश; गृहस्थी, सांसारिक, संन्यस्तजीवनाचे उल्लेख; कन्या, माता, गरोदर, वेश्या अशा स्त्रियांचे अनुभव, वाळवंट, जंगले, नद्या, पाउस, बागा, शेते, बर्फाळ थंडी, रखरखीत ऊन, समुद्राला मिळणाऱ्या नदीची आतुरता – किती वेगवेगळ्या प्रकाराने गीतेतला विचार ज्ञानेश्वरांनी समजाऊन सांगितला आहे! हे सर्व अनुभव त्यांनी कधी घेतले? इतक्या विविध प्रकाराने समुद्र, नदी, ओहोळ, तलाव त्यांनी कधी पहिले? मानवी व्यवहारातले हे इतके बारकावे आपल्या खडतर जीवनानुभवातून जात असताना त्यांनी कधी अनुभवले? त्या सगळ्याची संगती आपले विचार व्यक्त करताना, यमके साधत मांडणे हे प्रतिभेचे अलौकिकत्व नव्हे का? श्री विष्णूंसाठी विष्णूसहस्रनाम आहे. ज्ञानेश्वरीत अर्जुनाला किती वेगवेगळ्या नावांनी ज्ञानेश्वर महाराजांनी संबोधिलेले आहे. गुरूस्तुती करताना ज्ञानदेवांच्या प्रतिभेला उधाण येते. कित्येक अध्यायांची सुरुवात आणि शेवट ज्ञानेश्वर महाराजांनी गुरूस्तुतीत रममाण होऊन केलेला आहे. स्वत: इतके अधिकारी पुरुष असून गुरूंपुढे केवढी लीनता, त्यांच्या मदतीबद्दल केवढी उपकृतता! आणि सतत आपल्या गुरूच्या थोरपणाचे मनात सामावता न येणारे कौतुक.

     मराठी साहित्यात ज्ञानेश्वरीतल्या ओव्यांचे संदर्भ येतात. त्यामुळे वाचताना अशी एखादी ओवी आली की वाटायचे – अरेच्च्या, हे कुठेतरी ऐकले आहे पूर्वी. तर काही ओव्या केवळ सुंदर वाटल्या – म्हणतात न – all men are equal but few are more equal than others... – त्यातली गत. वाचत असताना अशा खास आवडलेल्या ओव्यांची नोंद करत गेलो. हा ५०, ५५ ओव्यांचा संग्रह हा खास माझा आहे. कुठल्याही अर्थाने त्यात ज्ञानेश्वरीचे किंवा गीतेचे सार नाही. केवळ मला जरा जास्त भावलेल्या या ओव्या. वाचनाच्या या उद्योगातून मला मिळालेला हा खरा ठेवा!

ज्ञानेश्वरी वाचायला सुरुवात करताना जरा काळजी होती. हा इतका गहन धर्मविचार मला कळेल का याबद्दल साशंक होतो. शेवटी फारसा धर्मविचार कळला नाहीच – त्या बाबतीत करंटाच राहिलो; पण ज्ञानेश्वरीच्या काव्याने, त्यातल्या गेयतेने ओलाचिंब झालो. वाचताना कित्येकदा मस्त मजा येत होती. आणि त्याचबरोबर हे शब्द ज्ञानदेवांनी कधीतरी प्रथम उच्चारले; ते मी परत उच्चारतो आहे या दडपणाने दबून जात होतो. प्राकृतातले विचार संपूर्ण कळले नाहीत, तरीती भाषा, ती शैली, मनाला स्पर्श करून जात होती. माझे सध्याचे वागणे किती बदलायला पाहिजे याची जाणीव वेळोवेळी होत होती. ज्ञानेश्वरांना सामान्यांपासून, थोर तत्ववेत्त्यांनी, संतांनी, धर्मज्ञांनी, कवींनी इतके का नावाजले हे थोडे जाणवत  होते. पहिल्यांदाच, कोणी सांगितले म्हणून नव्हे - तर मी त्यांचे विचार समजून घेण्याचा किंचित का होईना प्रयत्न केला म्हणून - ज्ञानेश्वर हे ‘महाराज’ आहेत हे भावत होते. सूर्य तेज:पुंज आहे हे माहिती असूनही, त्याच्याकडे जरा किलकिल्या डोळ्यांनी बघण्याचा प्रयत्न करताच डोळे दिपून जावेत, असा हा अनुभव होता.

     कैलास पर्वताचे प्रथम दर्शन असेच दिपवून टाकणारे होते. त्यानंतर वर्षभरातच मनाला स्पर्श करून गेलेला हा दुसरा अनुभव! दोन्हीमध्ये सहधर्मचारिणी “तुला एकट्याला सोडणार नाही” म्हणत आलेली आणि मग त्या अनुभवात बरोबर बुडून ‘सह’भागी झालेली.

“मागच्या वर्षी कैलास ट्रीप केलीत... आता या वर्षी काय?” – वाटलं होतं त्यापेक्षा जवळच तर आहे की उत्तर!!
----

                          अभिजित टोणगांवकर


1 comment:

  1. अभिजित, अतिशय स्तुत्य उपक्रम. तुझे 'ज्ञानेश्वरी वाचताना'चे अनुभव खूपच सुंदर. आता तुझी ज्ञानेश्वरी एकायचीय... link पाठव.

    - विवेक सबनीस

    ReplyDelete