पु.ल. आजोबा


१२ जून आला की दरवर्षी काही क्षणतरी रुखरुख वाटते की आयुष्यात एकदा तरी त्यांना प्रत्यक्ष ऐकायचं होतं, पाहायचं होतं, भेटायचं होतं पण नाही जमलं. पण खरं तर रडायला वगैरे आलं नाही कधीच. कारण रोजच्या जगण्यात त्यांच्या कुठल्या ना कुठल्या पुस्तकाची काही तरी संदर्भात आठवण आली नाही असं फार क्वचित झालं असेल

पु लंच्या एका पुस्तकात वाक्य आहे की "ज्या घरात वर्षातून निदान एकदा पुरणपोळी केली जात नाहीते घर मराठी नव्हे," त्याच धर्तीवर म्हणावंसं वाटतं "ज्या माणसाने आयुष्यात निदान एकदातरी पु लंच्या साहित्य संगीताचा आस्वाद घेतला नाही तो खरा मराठी रसिक नव्हे". 

कधीही भयंकर उदास वाटायला लागलं की 'असा मी..' किंवा 'बटाट्याची चाळ' काढावं आणि कोणत्याही पानापासून वाचायला लागावं. कधी 'अपूर्वाई' किंवा 'जावे त्यांच्या'... उघडून लंडन प्यारिसपासून अगदी हंगेरी इटली किंवा अगदी अमेरिकेतही मनमुराद भटकंती करून यावी. कधी तरी विनाकारण प्रचंड अस्वस्थ वाटत असतं तेव्हा 'एक शून्य मी' सारखा लेख वाचायला लागले की नेमकं कारण सापडतं अचानकच.व्यकती आणि वल्ली तर कितीही वेळा वाचाआजकाल तर पिल्लांसोबत नाच रे मोरा .. ऐकताना पण ते रोज सोबत असतातच.

नुसतं 'व्यक्ती आणि वल्ली' असंख्य वेळा वाचलं आहेप्रत्येक वेळी खळखळून हसता हसता डोळ्यात टचकन पाणी आलं नाही असं एकदाही झालं नाहीत्यातल्या नारायण, चितळे मास्तर, नाथा कामत ह्या नेहमी सगळ्यांच्या चर्चेत असलेल्या वल्ली आहेत. पण मला बापू काणे , लखू  रिसबूड, बोलट या वल्लीही तितक्याच किंबहुना जास्तच आवडतात. यातल्या अनेक वल्ली( प्रवृत्ती) आपल्या आजूबाजूला अनेकदा दिसतात, भेटतात तेव्हा पुलंचं लिखाण किती सार्वत्रिक आहे हे पटतं.

त्यांनी लिहिलेली प्रवासवर्णनं वाचणं नेहमीच भन्नाट अनुभव असतो. अपूर्वाईच्या सुरवातीला ते म्हणतात की "हे प्रवासवर्णन नाही तर प्रवासातल्या माझं वर्णन आहे " .हे अगदी पटतं  आणि तरीही ते मिश्कील  विनोदी शैलीतलं त्यांचं लिखाण वाचताना किती तरी महत्त्वाच्या गोष्टी सांगत छानसं काही शिकवून जातं.त्यांच्या नजरेतून मी ते सगळं पाहतेय असं वाटतं. कित्येकदा तिथलं चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. अपूर्वाई असो पूर्वरंग किंवा जावे त्यांच्या देशा.. त्यांच्या लेखनात मला नेहमी एक positivity सापडतेनेहमी प्रत्येक गोष्टीतलं चांगले काय ते सांगतच ते एखादं शल्यही नेमकेपणाने सांगतात की  दोन क्षण थांबून विचार करायला लावतातविशेष म्हणजे ही प्रवासवर्णने वाचताना काळाचा फरक असूनही ते तितकंच ताजं आणि रंजक वाटतं.


केवळ विनोदी आणि तेदेखील ठराविक मध्यमवर्गीय वर्गापुरतं लिहणारे लेखक वगैरे टिका कधी कधी ऐकायला येते तेव्हा मला नेहमी आश्चर्य वाटतं. एक शून्य मी, दाद, पुरचुंडी सारखी पुस्तके एकदा वाचली की असं विधान कुणी नक्कीच करणार नाही.

हसवणूक, उरलं सुरलं, बटाट्याची चाळ, खोगीरभरती, असा मी असामी ही पुस्तकं तर कधीही वाचावीत. मस्त मूड बनवतात आणि दिलखुलास हसवतात.

मैत्र किंवा गणगोत सारखी  त्यांना प्रत्यक्ष आयुष्यात भेटलेल्या व्यक्तींचं चित्रण करणारी पुस्तके खूप समृद्ध करणारी आहेत. नाटक, संगीत, साहित्य, चित्रपट सगळ्या क्षेत्रात वावरणार्या या झक्कास आजोबांशी आयुष्यात असा साहित्यिक सांगितीक परिचय नसता झाला तर काय याची कल्पना करवत नाही.

अजून खरं तर बरंचस वाचायचंऐकायचं बाकी आहे त्यामुळे माझा लखू रिसबूड होण्याआधीच थांबते.

त्यांची पुस्तकं वाचत, अगदी क्यासेटपासून ते आता युट्युब पर्यंत त्यांना ऐकत ऐकत मोठे झालोत आणि इथून जाईपर्यंत अगणित वेळा ते वाचणार, ऐकणार आहोत. लौकिकार्थाने त्यांच्या जाण्यामुळे आता त्यांना कधीच भेटता येणार नाही, आणखी  अजून नवं काही वाचता येणार नाही हीच खंत आहे. पण त्यांनी आधीच इतकं भरभरून दिले आहे की ते या जन्मी तरी पुरून उरेल नक्कीच 🙏🙏





- मीनल मंदार हिंगे



1 comment:

  1. सुरेख आहे लेख. शॉर्ट बट स्वीट. पुलंबद्दल जितकं वाचावं तितकं कमीच वाटतं.

    ReplyDelete