माझे मृत्यूपत्र


(अमृता प्रीतम यांच्या कवितेचा स्वैर अनुवाद)

आज अगदी पूर्ण शुद्धीत असताना
करून ठेवते आहे माझे मृत्यूपत्र

माझ्यानंतर शोधून काढा माझी खोली माझ घर
कुलूपाशिवाय टाकलेल्या कित्येक गोष्टी. . .
सापडतील जिकडे तिकडे पडलेल्या

बऱ्याच कोपऱ्यात पडली असतील माझि स्वप्न
वाटून टाका त्या शेकडो बायकांना
चार भिंतींच्या आत आयुष्य काढताना
विसरूनच गेल्या आहेत त्या स्वप्न पाहणं . . .

गोळा करा इकडे तिकडे पसरलेले माझा हास्याचे तुकडे पिशवीत भरून पाठवा एखाद्या वृद्धाश्रमात दूरदेशी गेलेल्या आपल्याच मुलांची वाट पाहणाऱ्या कंटाळलेल्या वृद्ध चेहऱ्यांना मिळू देत ते . .

पहा ते टेबल. . . बरेच रंग आहेत न पडलेले
उधळून टाका त्या पांढऱ्या साडीतल्या विधवांवर
सीमेवर गेलेल्या आपले जीवलगाची वाट पाहताना
आयुष्यच रंगहीन झालीत त्यांची. . .

अश्रू ही आहेत बरेचसे. . . तिकडे तिकडे दडवलेले
देऊन टाका एखाद्या कवीला
थेंबा थेंबातून गजल जन्माला येइल त्यांच्या . .

अब्रुदार स्त्री म्हणून नावलौकिक होता माझा
करून टाका त्या वेश्येच्या नावावर
मुलीला शिकता यावं म्हणून शरीर विकतेय ति. .

कपाटाच्या आत दडवलेली सापडेल थोडी प्रतिभाही
बघा घेतोय का कुणी वेडापीर
हातच सोडून अज्ञाताच्या पाठीमागे निघालेला . .

आता उरलाच असेल
बराचसा राग, काहीशी ईर्षा
थोडासा खोटारडेपणा, जरासा स्वार्थ
जमलच तर . . .
जाळून टाका माझ्याबरोबरच !

                             गंधाली सेवक


3 comments: