पागोळ्या - अनिश्का गणेश सावंत


बसस्टॉपवर उभी राहून, टप टप गळणाऱ्या पागोळ्या हातावर झेलत, मातीचा सुगंध अनुभवताना तिला वाटून गेलं की आपल्याला पाऊस फारसा आवडत नाही. 

हिवाळा... अगदी उन्हाळाही आवडतो. पण पावसाळा? नाय... नो... नेव्हर... 

तिने बाजूला उभ्या असलेल्या पूर्णपणे अनोळखी, अपरिचित अशा त्याच्याकडे पहिलं. डोळे मिटून, चेहऱ्यावर लोभसवाणे हास्य घेऊन, तो पागोळ्या हातावर घेत भान हरपून उभा होता. 

"काय बाई लोकं असतात एकेक.  पाऊस कसा काय आवडू शकतो लोकांना? श्या! बस पण येत नाहीय. किती वेळ झाला, पाऊस थांबायचं नावच घेत नाहीय. बस तर नाहीच येते, पण रिक्षा, टॅक्सी काहीच दिसत नाहीय रस्त्यावर. ओ गॉड,  अंधारायला लागलंय. शिट, मोबाईल पण मेलाय...
शी बाबा, काय वैताग आहे, आणि हा माणूस पाऊस एन्जॉय करतोय. याला घरबीर आहे की नाही? कसा बावळटासारखा उभा आहे. आता तोंड उघडून पावसाचं पाणी प्यायला नाही म्हणजे मिळवलं."
          
विचारासारशी तिला खुदकन हसू आलं. नेमका तेव्हाच तो तंद्रीतून बाहेर आला आणि त्याने तिच्याकडे पाहिलं. ती एकदम चपापून इकडेतिकडे पाहू लागली. 
          
"तुम्हाला मी मंद वाटलो असेन ना??"
         
तिने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. 

"मला पाऊस खूप्पच आवडतो. इतका की घरी जायला उशीर झाल्याचं भानही राहिलं नाही." तो.
           
तिने काहीच रिप्लाय दिला नाही. ती तिच्या आईने तिच्यासाठी पसंत केलेल्या आणि अजूनपर्यंत त्या न भेटलेल्या मुलाबद्दल विचार करत होती. 
"लग्न तर करायचंच आहे, पण इतक्या लवकर? तेही कोणा अनोळखी मुलासोबत. आईच्या मैत्रिणीचा मुलगा असला म्हणून काय झालं? नाही. घरी जाऊन नकार कळवायला सांगू या का आईला?... काय करू... काय करू... " 
                
"तुम्हाला पाऊस आवडत नाही का??" परत तो... 
              
तिने इरिटेट होऊन एकदा त्याच्याकडे पाहिलं. 
             
"नको. नकारच कळवू या. एकदा भेटून कसं ठरवू? नकोच. " 
हं... आता तिला जरा बरं वाटलं. 
पाऊस थांबला नव्हता. 
             
"तुम्हाला पाऊस आवडत नाही का??" परत तोच प्रश्न. 
             
"नाही. तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे?"   ती.
           
"प्रॉब्लेम काहीच नाही, पण पाऊस न आवडणारा प्राणी मी पहिल्यांदाच पाहतोय. हाहा..." तो
           
"देवा, हा तोंड बंद का करत नाहीय." 
             
"तुम्ही बससाठी थांबला आहात का?"  तो.
           
आता मात्र तिला मनापासून हसू आलं.  
           
"नाही, माझी 7.28 ची विरार लोकल येते या स्टॉपवर, त्यासाठी थांबलेय."  ती.

दोन क्षण गेले तिच्या बोलण्यातील खोच कळायला. नंतर तोही जोरात हसला. 
"येस, ऑफकोर्स! बसस्टॉप वर बसच येणार. स्टुपिड मी!" 
ती गालात हसली आणि पुन्हा दुसरीकडे पाहू लागली. आणि तो
तो गेला पुन्हा त्याच्या तंद्रीत. पाऊस थांबला नव्हता. 

दहा मिनिटांनी त्याने पुन्हा विचारलं, "राहता कुठे?" 

"घरात!" आणि ती पहिल्यांदाच मिश्किलपणे हसली. 

आता तो परत हसायला लागला. ऑकवर्डनेस गळून गेला. एकतर्फी प्रश्नांची जागा आता गप्पांनी घेतली. 

किती गम्मत असते ना, काही वेळापूर्वी अगदी अनोळखी असणारे दोघे आता गप्पा मारत होते. तसाही पावसाळी सिच्युएशन मुळे दोघांना ऑप्शन नव्हताच दुसरा. 

पाऊस अजूनही थांबला नव्हताच. 

बोलता बोलता त्याने कडेला असलेली टपरी दाखवली आणि म्हटलं, "चहा ऑस्सम मिळतो इथे. घेणार?"

ती एकदम अनइझी झाली. गप्पाबिप्पा ठीक, पण चहा वगैरे जरा जास्तच होतंय नै...  

"मला चहा आवडत नाही."  ती.

"काय? तोही नाही आवडत? माझं ऐका, इथे-”

"मला तुमचा फोन मिळेल का प्लीज? माझा फोन बंद पडलाय."  त्याचं बोलणं अर्धवट तोडत तिने विचारलं . 

"अं? हो हो, घ्या की." 

तिने थँक्स म्हणत त्याच्या फोनवरून कॅब बुक केली. 

"तुम्ही मालाडला राहता? आय मीन तुमचं घर मालाड ला आहे? " तो. 

कॅब बुक करताना तिचं बोलणं त्याने ऐकलं होतं. 

"हो. तुम्ही? "

"मी दहिसर. रोज तुम्ही याच बस ने जाता का?" तो.

" तुम्ही सर्वांना रोज इतकेच प्रश्न विचारता का??" ती

तो थोडा हिरमुसल्यासारखा झाला अस तिला वाटलं. मग तिने हसून सांगितलं, "आज माझा पहिला दिवस होता ऑफिसचा." 

" ओsss म्हणजे आपण भेटूच आता रोज."  तो.

"माझी कॅब आली, मी निघते." 

ती कॅबमध्ये बसली. काच खाली करून तिने म्हटलं, " या, बसा आत. मी मालाडपर्यंत सोडते तुम्हाला. डोन्ट वरी, भाडं मीच देईन. नंतर मालाड पुढचं तुमच्या घरापर्यंत तुम्ही द्या." 

तो चमकला,  "चालेल?"

ती, "न चालायला काय झालं?" 

तो बसल्यावर ड्रायवर कुरकुरला, "देखो बहनजी, इतनी बारीस मे कॅब सिरफ मालाडतक जायेगी।" 

ती बोलली , "ठीक है भाई साब, मालाड तक ही चलिये। तुम्हाला मालाडवरून दुसरं काही मिळेल." 

"नो प्रॉब्स." तो.

पाऊस थांबत नव्हता. 

एसीच्या थंडीत त्याचं नाक वाहायला लागलं होतं. फटाफट शिंका चालू झाल्या होत्या.  त्याचं जोकरसारखं लाल झालेलं नाक बघून तिला परत हसायला आलं. 

"तुम्हाला पाऊस इतका आवडतो की त्यामुळे तुमच्या नाकातून नदीनाले वाहू लागलेत." तिने चिडवलं.

हे ऐकून तो आणि ड्रायव्हर एकसाथ हसले. 

"भैयाजी, आप क्यू हंसे?" तो.

"साबजी आमालाबी थोडे थोडे मराटी येते." 

आता मात्र तिघेही हसू लागले.  तिने त्याला आपल्या पर्समधून नॅपकिन काढून डोकं पुसायला दिला. त्यानेही काही फॉर्मलिटी न करता तो घेऊन स्वतःच डोकं कोरडं केलं. ते नसतं केलं तर नाकातल्या नदीनाल्यांचे झरे वाहायला लागले असते. 

पाऊस थांबला नव्हता. 
मालाडला टॅक्सी थांबली. 
अचानक तिच्या मनात काय आलं, ती म्हणाली, " तुम्हाला आता इथे रिक्षा, टॅक्सी मिळणं थोडं कठीणच वाटतंय. तुम्हाला थोडं अलीकडे चालत जावं लागेल. पण त्याआधी तुम्हाला माझ्या घरी येऊन माझ्या आईच्या हातचा चहा घ्यावा लागेल. आणि हो, ती तुमच्या त्या टपरीवाल्यापेक्षा मस्त चहा बनवते." 

तो परत थोडा गोंधळला. म्हणाला, "आर यु शुअर?? मला एनिवे चहाची फार गरज होतीच."

"येस 100%"  ती. 

घरी दरवाजा आईनेच उघडला. 
"अगं, किती लेट... किती पाऊस पडतोय, तुला एक फोन नाही का गं करता येत? स्विच ऑफ करून ठेवलाय तो. मला किती काळजी लागून राहिली होती." 

"आई, आई रिलॅक्स! रिक्षा, बस, टॅक्सी काही नव्हतं. अगं पाऊस किती आहे. फोन बंद झालाय. यांनी मला फोन देऊन मदत केली नसती तर कॅब पण बोलवता आली नसती."  ती.

आईने एकवार त्याच्याकडे पाहिलं आणि ओरडलीच, "अय्या, राहुल तू? तू कुठे भेटलास हिला? हिने तर नाही पाहिलं तुला कधी, तुमची ओळख कुठे आणि कशी झाली??" 

"अगं आई हे मला बसस्टॉपवर भेटले. यांनीच तर मदत केली ना."  ती.

"सोना, अगं हाच माझ्या मैत्रिणीचा मुलगा. ललिताचा राहुल." आई.

आता मात्र ती खरंच अवाक् होऊन त्याच्याकडे पाहू लागली. 

"काय करू, मला तुझा फोटो पाहताक्षणीच तू आवडली होतीस. पण तू काय भेटायला रेडी नव्हतीस. जस्ट मुंबई-पुणे-मुंबई पाहिलेला, म्हटलं हीच ट्रिक वापरावी."  तो.

आई खुश होऊन चहा बनवायला गेली. 

ती मात्र बावळटासारखी त्याला पाहत तिथेच उभीच राहिली. 

तो अचानक तिच्या जवळ, खूप जवळ आला... तिच्या डोळ्यात खोलवर आपली नजर रुतवत तिला म्हणाला, "मला तू खूप आवडलीस सोना, पण तुझ्या मनात माझ्याविषयी काय आहे हे मला माहीत नाही. पण घाई नाही, टेक युअर ओन टाईम. आय विल बी वेटिंग फॉर यू."

ती काही न बोलता बाल्कनीत गेली. पाऊस थांबला नव्हताच. पण पावसाबद्दल तिचं मत नक्कीच बदललं होतं. तिने पटकन मागे वळून पाहिलं, आणि हसून म्हणाली, "मला पावसात तुझ्या सोबत भिजायला नेशील?"

तो म्हणाला, "बघ हां, माझ्या नाकातले हे नदीनाले आयुष्यभर तुला झेलावे लागतील." 

ती आता खूप खूप हसायला लागली... अखंड कोसळणाऱ्या पावसासारखीच... 

--- अनिश्का गणेश सावंत 




1 comment: