लेख स्पर्धा: द्वितीय क्रमांक

कुछ कह रही हैं किताबें

  कुणी, वाचक होता का रे, वाचक?
एका पुस्तकाचा कुणी वाचक होईल का?

एक पुस्तक वाचकावाचून, अभ्यासकावाचून,
दर्जेदार लेखकांवाचून, निर्व्याज वारशावाचून,
अडगळीतून, रद्दीच्या डोंगरात हिंडत आहे....

थोडंसं फिल्मी वाटलं ना? पण मित्रा आपल्या या छोट्याशा गुजगोष्टीनंतर तुला यातलं मर्म कळेल असा मला विश्वास वाटतो. मी कोण ? .... मी गुरुसम्राट - "पुस्तक". जमिनी आणि भिंतीवरील रेघोट्यांपासून सुरु होऊन शिलालेख, भूर्जपत्र, कागदी पुस्तक असा प्रवास करीत आता मी डिजिटल रूपात अवतरलो आहे. मी तुझा मित्र आहेच पण तुझ्या पालकांचा, आजोबांचा आणि पूर्वजांचादेखील गुरु आणि मित्र आहे. आई, वडील, शिक्षक याव्यतिरिक्त चौथा गुरु म्हणजे ग्रंथ. औषधाशिवाय रोग हटत नाही, तसा प्रकाशाशिवाय अंधार मिटत नाही. पंडित नेहेरु नेहमी म्हणायचे - "पुस्तकांशिवाय मी जगाची कल्पनाही करू शकत नाही."

विद्यार्थिदशेपासून जर पुस्तकाशी गट्टी जमली तर ही मैत्री आयुष्यभर टिकते. टीव्हीवरील कार्टून चॅनेलचे आक्रमण ही मैत्री होऊ देत नाहीत. मुलांचा भाव आणि बुद्धीचा विकास कॉमिक्सपर्यंतच सीमित राहिलाय. लोकगीत, लोककथा यांची त्यांना माहिती होत नाही. शिक्षण पद्धतीत काळानुरूप बदल होत आहेत. रोजचा गृहपाठ हा आवश्यक आहेच पण त्याशिवाय आजूबाजूला एक अमर्याद आणि सतत बदलत जाणारं अस्थिर जग आहे, याची जाणीव मुलांना करून देणं अत्यंत गरजेचं आहे. जगाच्या असंख्य पसाऱ्यातील गोष्टींबाबत पुस्तकाद्वारे जिज्ञासा जागृत केल्यास,त्यांचे ज्ञानचक्षू निश्चित सजग आणि तत्पर होतील. बालपण आणि पौंगंडावस्था हा तर आयुष्याचा पाया. अध्ययनाचा सर्वोत्तम काळ. त्याकरिता वाचनालय म्हणजे ज्ञानमंदिर असेच मुलांवर ठसवायला नको का ? त्यासाठी मोठ्यांना सतर्क आणि सज्ज व्हायला पाहिजे. कारण पुस्तकांची गोडी लावणं हे वारसा सोपवण्याच काम आहे. जस पिढीजात व्यवसाय असतात, तसा पुस्तकांचा वारसा अलगद एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे गेला पाहिजे. जगप्रसिद्ध लोकांच्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी केलेल्या चुका व त्या सुधारून यशस्वी होण्यासाठी शोधलेला मार्ग यांचा खजिना लपलेला आहे. योग्य वयात अशा अमृतवेलीवरील फळे चाखायला मिळणं म्हणजे परमभाग्यच जणू. रंजन करता करता डोळ्यात अंजन घातलं गेलं पाहिजे ते याचसाठी. "भावेंविण देव न कळे नि:संदेह।गुरुविण अनुभव कैसा कळे।।"

ग्रंथ हे आपल्या आयुष्यभराची शिदोरी असतात. तरुणांना वाईट प्रवृत्तींवर विजय मिळवून सुखी व्हायला ग्रंथच साहाय्य करतात. ज्ञानेश्वरांचे पसायदान सांगते - "आणि ग्रंथोपजीविये। विशेषीं लोकीं इये। दृष्टादृष्ट विजयें। हो आवे जी ।।" विद्यार्थी विषय समजून न घेता मार्क्स मिळविण्यासाठी 'वननाईट एक्झाम स्टडी' करतात. मायक्रो झेरॉक्स करून एका पानावर सात-आठ चॅप्टर बसवून कॉपी करतात. मी आयुष्य सोडवण्याचा सायफर टेक्स्ट आहे, परीक्षा सोडवण्याचा नाही. मी निष्कपट, निस्वार्थी मनाने तुमच्या सेवेसाठी सदैव तत्पर असतो. गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेन्ड सारखा मी ब्रेकअप करून निघून जात नाही. माझा योग्य  वापर करणारे प्रगती करतात. अशांचे कोडकौतुक तर करायलाच हवं. त्यांनी दुमडलेली, खुणा केली पाने म्हणजे माझ्या हसऱ्या गालावरची खळी असते. अभ्यासादरम्यान वेगवेगळ्या रंगांच्या पेनांनी केलेल्या माझ्यावरील खुणा म्हणजे माझी आभूषणे असतात. छछोर अश्लील साहित्याला वगळून, संपूर्ण व्यक्तिमत्व विकास साधणाऱ्या  साहित्याचा तरुणाई स्वीकार करते आहे का? पुस्तकाचा किडा असावा, पण पुस्तकी किडा होऊ नये. उथळ पुस्तकांमध्ये गुंतून पडणारा समाजापासून एकटा पडतो. आजूबाजूच्या सभ्य संस्कृतीचं त्याला भान राहात नाही. जीवनाला दिशा देणाऱ्या, प्रेरणादायी पुस्तकांचं वाचन समाजभान जागवतात. मनुष्य, समाज आणि देशाला स्थायी-प्रतिष्ठा प्रदान करतात. आकाशात जशी असंख्य रंगांची उधळण असते तशी पुस्तक भांडारामध्ये असंख्य गुणदर्शनाची ताकत असते. यातला प्रत्येक गुण म्हणजे जगण्याचं टॉनिक आहे. वेचावं तितकं कमीच. संत एकनाथांनी म्हटलंच आहे - "जो जो जयाचा घेतला मी गुण। तो तो मी केला गुरु जाण।।"

मला सांग मित्रा, एक छंद म्हणून तू रोज किंवा आठवड्यातून एकदा तरी पुस्तक वाचतोस का? काय म्हणालास? आजच्या धावपळीच्या, इंटरनेट  आणि मोबाईल च्या युगात पुस्तक कोण वाचणार? भले शाब्बास! अं तेही बरोबर आहे तुझं पण या नाण्याची दुसरी बाजू बघकी एकदा. पुस्तक हातात घेणं, त्याची पानं पालटण, हळूहळू उलगडत वाचणं, आवडत्या वाक्यावर खुणा करणं, पानांमध्ये मोरपीस किंवा गुलाबाचं फूल ठेवणं हा अविस्मरणीय आनंद डिजिटल रूपामध्ये नाही रे. मी फक्त मनोरंजनाचं साधन नाही. अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी यांचं उच्चाटन करून जनजागृती करण्याचा मी मार्ग आहे. माझ्या मात्रेनं जर अंधश्रद्धेची कीड नष्ट होऊन देशविकासाला हातभार लागला तर माझ्यासारखा सुखी मीच. प्रत्येक धर्माचा सर्वमान्य असा एकतरी पवित्र ग्रंथ ठरलेला आहे. भगवद्गीता, कुराण, बायबल, ऐतिहासिक दप्तरं, पौराणिक ग्रंथसंपदा यांचा प्रपंच आपल्या पूर्वजांनी उगाच का केला असेल? संत कबीर म्हणतात - "पानी मे मीन प्यासी, मोहे सुन सुन आवे हसी। कहत कबीर सुनो भाई साधो, गुरु बिन भरम न जासी।।"

माझ्या समोरील समस्या कमी नाहीत. तुमच्यापर्यंत पोहोचणं मला इतकं सोपं राहिलेलं नाही. महागाईमुळे पुस्तकांच्या किमती वाढतात. त्यात भर म्हणजे सवलतीच्या दराच्या अस्पष्ट जाहिरातींमुळे गोंधळ होतो. टिळक, सावरकर, आगरकर यांसारखे तुरुंगामध्ये उपाशीपोटी राहूनदेखील देशप्रेमाचा जाज्वल्य अभिमान स्वतःच्या लिखाणामधून साकारणारी देवमाणसे आता कुठून मिळणार? लेखन हे करियर म्हणून किती लोक स्वीकारतात? मान्य आहे की करियरपेक्षा लेखनाकडे एक छंद किंवा नैसर्गिकपणे फुलणारी कला म्हणून पाहिले पाहिजे. परंतु मानधनाचा प्रश्न आड येतो ना. पैसाच नाही मिळाला तर लेखकाचा चरितार्थ कसा चालणार? मग अशा परिस्थितीमध्ये दर्जेदार लेखनासाठीची टाहोफोड कितपत परिणाम करू शकेल? बऱ्याचदा लेखक बिचारा कॉपीराईट, लेखनाविषयीचे कायदे यापासून अनभिज्ञ असतो. याच्या जोडीला पुस्तकातील मजकुरावरून होणारे वाद आणि राजकारण खच्चीकरण करीत असतात. पायरसी आणि फोटोकॉपीज मुळे दर्जेदार पुस्तकांचा खप घटतो आहे. साहित्य संमेलन आणि पुस्तक प्रदर्शन हे लेखकाला कलाकृती रसिकांसमोर ठेवायला मदत करतात. राज्यस्तरीय संमेलने आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली याचा मला सार्थ अभिमान आहे. या कार्यक्रमांमध्ये योग्य ती संबंधित माणसं पोहोचावीत हीच माझी माफक अपेक्षा आहे.

माझं थोडंसं 'शनी' महाराजांसारखं आहे. जो माझी अवहेलना करतो किंवा माझ्याकडे दुर्लक्ष करतो त्याला या दुष्कर्माचे जशास तसे फळ मिळते. होतकरू पिढीचा माझ्याबाबतचा 'यूज अँड थ्रो' दृष्टीकोन माझ्या जिव्हारी लागतो रे. एक आहे वत्सा, दुर्लक्षित झालो तरी मी काही लुप्त वगैरे होणार नाही बरं का. कारण माझा लळा लागलेली, माझी भक्ती करणारी माणसे होती, आहेत आणि येत राहातील. भारताचे माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण ज्या ज्या ठिकाणी पदभार सांभाळायचे तिथं त्यांची पासष्ठ हजार पुस्तकांची वैयक्तिक ग्रंथसंपदा सोबत घेऊन जायचे. आंबेडकरांनी पथदिव्याखाली बसून माझी कठोर तपश्चर्या केली म्हणून ते भारताची राज्यघटना लिहिण्याइतके सक्षम बनले. संत तुकारामांच्या गाथा, नाठाळांनी पाण्यात बुडवल्या. पण तो परमभक्त नदीकिनाऱ्यावरून तसूभरही हलला नाही. देवालाही नियतीपुढे झुकावे लागले आणि तुकारामांच्या गाथा पाण्यातून काढून त्यांच्या स्वाधीन कराव्या लागल्या.

तेंव्हा माऊली उठा. जागे व्हा. व्हॉट्सऍप, फेसबुकवर चांगली पुस्तकं शेअर करण्यासाठी ग्रुप बनवा. एकत्र जमून कादंबरी, काव्यवाचन करा. पुस्तकं विकत घ्या, भेट द्या. तुम्ही मला हृदयाशी धरा, मी तुम्हाला समृद्ध जीवनाशी एकरूप करतो. शेवटी पुन्हा फिल्मी होऊन विचारतो- "किताबे बहोतसी पढी होगी तुमने, मगर इनका चेहेरा क्या तुमने पढा है?" तेंव्हा मर्म हेच की -
"गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः ||" 

- अविनाश शंकर 

1 comment:

  1. सुरेख लेखन, खूप छान माहिती दिली आहे या लेकमध्ये.

    ReplyDelete