'वत्सा, मी तुजप्रत प्रसन्न आहे! अमरत्व सोडून काय हवे ते माग.' - तुम्हाला असं देव म्हणाला तर? काय मागाल? मी झोप मागेन. लहानपणी, तिसरी-चौथीत हा हमखास निबंधाचा विषय असतो आणि त्या वेळेच्या परिस्थितीवर उत्तर अवलंबून असतं. 'मला इंजीन ड्रायव्हर व्हायचंय' किंवा अंतराळवीर किंवा 'दररोज शंभर चॉकलेट्स पाहिजेत' किंवा 'शेजारच्या बंड्याला नाकावर ठोसा मारता येईल इतकी ताकद दे' असलं काहीतरी. थोडं मोठं झाल्यावर, ह्या इच्छांचं स्वरूप बदलतं - 'वर्गात पहिला नंबर येउ दे', 'बाजूच्या बाकावरची शालिनी माझ्याकडे बघून हसू दे'... अशासारखं. वय वाढलं की मागण्याही! अतृप्त इच्छा पूर्ण करण्याची संधी होते. एखादा निपुत्रिक संततीची मागणी करेल, तर धनवान सत्तेची, राजकारण्याला प्रतिस्पर्ध्याचा नायनाट हवा, कुणाला लॉटरी हवी तर कुणाला छोकरी! आयुष्यात सरळपणे जे काही मिळालेलं नाही ते अत्यंत सहजपणे साध्य करण्याची ही सुवर्णसंधीच. तेव्हा, मला झोप पाहिजे हा माझ्यातला सुप्त आळशीपणा बोलतो आहे असं वाटणं स्वाभाविकच आहे.
या मागणीमागे माझा आळशीपणा नाही, पण अंत:स्थ हेतू नक्कीच आहे. कुठेतरी वाचलेल्या एका कथेत, एक केवळ गरिबीमुळे अविवाहित राहिलेल्या माणसाला जेव्हा असं वरदान मिळालं, तेव्हा त्याने 'माझ्या नातवाच्या राज्याभिषेकात मानसोक्त नाचायची संधी मिळावी...' असा वर मागितला. म्हणजे एका इच्छेत, त्याने विवाह, गरिबीपासून सुटका, संतती, एकंदरीतच खानदानाची बरकत आणि मुख्य म्हणजे स्वतःच्या उत्तम तब्येतीची तरतूद करून घेतली.
माझी मागणीसुद्धा अशीच चतुराईची आहे. 'माझ्या उर्वरित आयुष्यात दररोज आठ तास गाढ झोप मला मिळावी' अशी माझी मागणी असेल. अहो, सुरेख झोपेनंतर दुसऱ्या दिवशी काम करायला काय उत्साह असतो. अख्ख्या जगाने आपल्यावर फेकलेले प्रॉब्लेम्स हसत झेलण्याची ताकद ती झोप देते. पण त्याच बरोबर अशी झोप येण्यासाठी आपलं आर्थिक, सामाजिक, मानसिक, वैवाहिक, शारीरिक स्वास्थ्य उत्तम असणं अत्यावश्यक असतं. यातली एकही बाब जरा इकडे तिकडे असू द्या - झोप उडालीच म्हणून समजा. म्हणजे मला 'आठ तास गाढ झोपेचं' वरदान देणाऱ्याला माझ्या आर्थिक, सामाजिक, मानसिक, वैवाहिक, शारीरिक स्वास्थ्याची अगदी तळहातावरल्या फोडाइतकी काळजी घ्यावी लागणार! आहे की नाही सुखाची गुरुकिल्ली देणारी मागणी?
पण या मागणीत एक अजून मोठी गोष्ट लपली आहे. माणूस जर सगळ्यात जास्त अस्वस्थ कशाने होत असेल तर तो मृत्यूच्या जाणिवेनं. आणि गंमत म्हणजे, ती भीती अटळ असणाऱ्या मृत्यूची नसते, तर मृत्यूकडे नेणाऱ्या प्रवासाची भीती असते. बहुतांशी मृत्यूआधी येणारं परावलंबित्व, असहायपणा, आजारपण, त्यातल्या वेदना - या सगळ्याची ती भीती असते. त्यामुळेच प्रदीर्घ आजारानंतर मृत्यू पावलेल्याला 'सुटला बिचारा' असं म्हणतात आणि शांत झोपेतून न उठलेल्याला - 'सुखी होता' असं संबोधतात. आणि म्हणून हक्काची आठ तास झोप ही, त्या 'सुखी होता'च्या वाटेची मागणी आहे.
मी नास्तिक नसलो तरी देवभोळा खासच नाही. तेव्हा माझ्यावर तरी देव प्रसन्न होण्याचा प्रश्नच नाही. 'प्रतिरात्री आठ तास शांत झोपेची' मागणी पूर्ण करण्यासाठी मलाच माझा देव होऊन प्रयत्न करावे लागणार! त्यासाठी कमीतकमी सकाळी पाच वाजता उठून फिरायला जावं लागणार... उद्या सकाळचा गजर लावला आहे हे बघतो आणि इथे थांबतो.
आवडलंय!! मस्त!!
ReplyDeleteLiked the originality in your thoughts, Abhijit. Agree.
ReplyDeleteखुप सुंदर!!
ReplyDeleteकेदार.
खुप सुंदर!!
ReplyDeleteकेदार.