अनुराधा गोरे! एक मध्यम वर्गीय कुटुंबातील आई! अशी त्यांची साधीशी ओळख काही वर्षांपूर्वी होती. पण ९५ सप्टेंबर साली, काश्मीरमध्ये असलेल्या त्यांच्या मुलाला, कप्तान विनायक गोरे यांना वीरमरण प्राप्त झाले आणि एका आईचे आयुष्यच बदलून गेले.
१९७५ ते २००३
त्या पार्ले टिळक विद्यालयात माध्यमिक शिक्षिका होत्या. जून २००३ ते ऑगस्ट २००७
पर्यंत रामदेव पोतदार शाळेत मुख्याध्यापिका. या सर्व कालावधीत विद्यार्थ्यांच्या
गुणवत्ता विकासासाठी त्यांनी अनेक कार्यक्रम राबविले. याच कार्यक्रमांचे लेखन आणि
सादरीकरण केले. बऱ्याच वृत्तपत्रांत आणि दिवाळी अंकांत याच विषयावर स्तंभलेखन
केले.
त्यांना
महाराष्ट्र शासनाने 'वीरमाता' पुरस्कार
तसेच सह्याद्री वाहिनीने 'हिरकणी'
पुरस्कारानी सन्मानित केले आहे.
त्यांची 'वारस
होऊ अभिमन्यूचे', 'आचंद्र -सूर्य नांदो', 'कळी उमलताना', 'गाऊ त्यांना आरती', ' जॅक
ऑफ ऑल', 'कथासागर', ' शौर्यकथा', ' ओळख सियाचेनची', 'परीक्षेची भीती कशाला?' अशी
पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या कार्याची ओळख त्यांना आलेल्या अनुभवांतून (पुस्तकातून)
नक्कीच होईल.
त्यांची IBN लोकमतवर झालेली प्रसिद्ध मुलाखत देत आहोत. त्यांचा प्रवास त्यांच्या शब्दातून...
Copyright:IBN LOKMAT
Copyright:IBN LOKMAT
वीरमाता अनुराधा गोरे यांना, त्यांच्या कार्याला आणि त्यांच्या सारख्या सर्व वीरमातांना मानाचा मुजरा. आम्हा सर्व भारतीयांमध्ये त्या अशाच देशप्रेम जागृत करोत आणि पुढच्या पिढीला प्रेरणास्त्रोत ठरोत ह्याच शुभेच्छा!!
ग्रंथाली प्रकाशनातर्फे
प्रकाशित झालेले पुस्तक 'ओळख सियाचेनची’.
प्रत्येक जबाबदार भारतीय नागरिकाने वाचायलाच हवे असे हे पुस्तक. वीरमाता सौ. अनुराधा गोरे यांनी हे पुस्तक अतिशय अभ्यासपूर्वक लिहिले आहे.
साधारण तीन भागात हे पुस्तक विभागले आहे. पहिल्या भागात लेखिकेने काश्मीरच्या अनेक ज्ञात आणि अज्ञात गोष्टींचा इतिहास मांडला आहे. अगदी नीलमत पुराणातील
काश्मीरच्या उल्लेखापासून हजारो वर्षांचा
इतिहास ते स्वातंत्र्य मिळाल्यानंतरची सदुसष्ट वर्षे असा हा इतिहासाचा कालखंड
आहे. विविध दाखले, नकाशे, बारीकसारीक तपशिलांनी युक्त असे त्यांचे लिखाण वाचकाला गुंग करून टाकते. लेखिकेचे
अतिशय साधे-सोपे, सहजपणे समजावून सांगणे
वाचकाला संस्कारित करत जाते.
दुसऱ्या भागात एकेकाळचे
सियाचेन क्षेत्र सीमेवर का आले, कसे आले, इथे कॊणत्या लढाया खेळल्या गेल्या
यांचे तपशीलवार वर्णन आहे. एकीकडे ह्या युद्धात फार मोठी कामगिरी
गाजवणारे कर्नल नरेंद्र सिंह, परमवीरचक्र मिळालेले बाणासिंग यांसारख्या वीरांच्या कथांबरोबर शासन आणि शासकीय यंत्रणेतील कमतरताही लेखिका
वाचकांसमोर मांडत जातात. १९३०पासून ते आतापर्यंतचे पाकिस्तानचे धोरण, कूटनीती, त्यांच्या अल दिनिया मागण्या 10 (All-Dinia-१०. दहा स्वतंत्र राज्यांची मागणी), चुकीचे नकाशे इत्यादी
सर्व धक्कादायक माहिती वाचकाला मिळत जाते. शाळेच्या पुस्तकातील नकाशात दाखवलेली आपल्या देशाची सीमा कशी व का बदलत गेली हे कटू सत्य
वाचकाला हादरवून टाकते. ‘जो देश इतिहास विसरतो त्याचा
भूगोल कसा बदलत जातो आणि जे राज्यकर्ते देशाचा भूगोल विसरतात ते इतिहास घडवू शकत नाहीत’ हे लेखिका फार प्रभावीपणे ह्या भागात वाचकांसमोर मांडतात.
प्रसिद्धी माध्यमांपासून
कायम दूर राहिलेले असे आपले सीमेवरचे सैनिक. पुस्तकाच्या तिसऱ्या भागात अनुराधाताईंनी
ह्या सैनिकांना बोलतं केलं आहे. पुस्तकात ठिकठिकाणी फोटो घातल्याने सियाचेनचा परिसर
जिवंत झाला आहे. यात सैनिकांचे नेतृत्वगुण, वीरता, धाडसी वृत्ती, त्यांचा मानसिक-भावनिक व शारीरिक
सशक्तपणा, देशभक्ती,
ऑफिसर्सचा सैनिकांबाबत असलेला वत्सल भाव, त्यांच्या
श्रद्धा, साधेपणा अशा त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक छटा आपल्याला
बघायला मिळतात.
सियाचेन ही जगातील
सर्वात जास्त उंच, थंड व कठीण युद्धभूमी.
इथे ऑक्सिजनचे प्रमाण अतिशय कमी. इथे अतिशय
कठीण परिस्थितीत आपले ९० दिवसांचे टेन्युअर पूर्ण करून परत आलेल्या सैनिकांचे अनुभवकथन ह्या भागात
आहे. सैनिकांच्या कथनातून सियाचेनची
दुर्गमता, तेथील नैसर्गिक आपत्ती, निसर्गाचा लहरीपणा, सैनिकांचे ट्रेनिंग, त्यांचे पोशाख, त्यांचे दैनंदिन जीवन,
त्यांची खाण्यापिण्याची व्यवस्था, त्यांचे कॅम्प्स,
चौक्या, अपघात, आजारपण इत्यादी माहिती आपल्याला मिळते.
आपण सिव्हिलिअन्स तेथील जीवनाची कल्पनाही करू शकत नाही. तेथील खचदऱ्या, हिमवादळे, बर्फाच्या भिंती, कडे
कोसळणे अशा नैसर्गिक आपत्तींची वर्णने मन हेलावून टाकतात. सैनिकाला येणारा एकाकीपणा,
त्यामुळे होणारे भास व इतर मानसिक व शारीरिक आजार वाचून ह्या साऱ्यांच्या
जिवावर एरवी सुखासीन आयुष्य जगणारे आपण अंतर्मुख होतो... आयुष्यातील क्षणभंगुरतेच्या
अनुभवातून निर्माण झालेले सैनिकांचे आध्यत्मिक विचार वाचताना, कुरुक्षेत्रावरची गीता जगणाऱ्या ह्या स्थितप्रज्ञ देवमाणसांपुढे आपण नतमस्तक होतो.
खरोखरच, 'ओळख सियाचेनची' हे पुस्तक एक जनजागरण
आहे. हा वीरमातेचा संस्कार आहे...एक विलक्षण अनुभव आहे.
Salute
ReplyDelete