चहा ही अगदी सोपी
गोष्ट आहे, असं म्हणणाऱ्या प्रत्येकाला मी साष्टांग नमस्कार घालते. म्हणजे एका
कपाला अमुक इतके पाणी, तमुक इतकी साखर, मग तमुक चहा पावडर असे अगदी
कितीही ठरवून घेतलं, तरी माझा सलग दोन दिवसांचा चहा कधी सारखा होत
नाही. बरं एकदा तर मी किती वेळ उकळायचा हे सुद्धा लावून बघितलं, तर त्या दिवशीचा चहा अगदीच भुक्कड झाला. मग कधी तरी आलं घालून बघू या, असं म्हणत आलं घालून चहा केला, पहिल्या दिवशी आल्याची चव नव्हती तर दुसऱ्या दिवशी फक्त आल्याची चव
होती. तिसऱ्या दिवशी आल्याचा चहा लागत होता, पण चहाची चव आवडली नव्हती.
रेड लेबल देखा, गिरनार देखा, ब्रूक बाँड देखा, देखा वाघ बकरी भी, पण माझा वाला ब्रँड
मात्र मला आजतागायत सापडला नाही. अमुक एकाने रंग छान येतो असं वाटतं, तर दुसऱ्याने कडकपणा, तिसऱ्यात घट्टपणा
असतो. सगळं कधीच एकातच मिळतच नाही. कधी तरी मसाला घातलेला चहा घेतला, तर त्या मसाल्यामुळे आपण काढा पितोय की काय असंच वाटतं. त्यामुळे
चांगल्या चहाच्या शोधात मी नेहेमीच वेगवेगळे प्रयोग करून बघते, आणी त्या प्रयोगाच्या नादात आज सापडलेली रेसिपी उद्या विसरून जाते.
एकदा कोणीतरी म्हटलं दुधाने खूप फरक पडतो, म्हशीच्या दुधाचा चहा छान घट्ट होतो, त्यावर मी फक्त आता एक म्हैस दारात उभी करायची बाकी आहे असं
मनातल्या मनात म्हणत मुंडी हलवली. तरी त्यातल्या त्यात जवळ जाणारा प्रयोग म्हणून
मिल्क पावडर घालून चहा करून प्यायले, तर मला घरातल्या घरात
विमानात बसल्यासारखं वाटायला लागलं. इतकी जिभेवर विमानातल्या मिल्क पावडरच्या चहाची
आठवण घट्ट होती.
नव्याने उठलेल्या
चुलीच्या चवीच्या वादळात, चुलीवरच्या चहाचा चुलत
भाऊ असलेला तंदूर चहादेखील मिळायला लागला आहे. व्होडका घातलेला चहा हे एक अफलातून
कॉकटेल शॉट म्हणून प्रसिद्ध आहे. चॉकलेट टी हे मुळातलं डेझर्ट ड्रिंक, पण आता
व्यवस्थित रुळलं आहे. ग्रीन टी तर उंचे लोग उंची पसंद म्हणत आपला रंग टिकवून आहे.
चहाचे अनेक प्रकार जन्माला आलेत. असं म्हणतात, बदल हा सृष्टीचा नियम आहे. म्हणून तर ही चहाची सारी रूपं मी चाखून, ओरपून पाहिलीत. चहा पावडर, साखर, पाणी, दूध या चार जिन्नसातून
रोज होणाऱ्या वेगळ्या चवीच्या चहामुळे मी ‘थ्री हंड्रेड अँड सिक्स्टी फाईव्ह
शेड्स ऑफ टी’ अशा नावाचं पुस्तक लिहावं की काय अशाच विचारात आहे. मग फोनवर टाईप
करण्याच्या नादात जास्त उकळलेला चहा, गॅसवरून उतू गेलेला
चहा, भांड्यातलं दूध संपवायचं म्हणून थोडं जास्तच दूध
घालून केलेला चहा, साखर घालायची विसरलेला चहा, अर्धवट झोपेत असताना मीठ घालून केलेला चहा, खरंतर वर्षाच्या दिवसांपेक्षा खूप जास्त रेसिपी प्रत्येक घरातून
नक्कीच मिळू शकतात.
त्याच त्या चवीचा चहा
रोज करणाऱ्या अमृत तुल्यचे मूल्य माझ्या मते त्यामुळेच जास्त आहे. शेवटी काय आहे
चहाने चार माणसे जोडली जातात, गप्पा खुलतात, कधी वाईट चवीचा विसर पडतो, तर कधी चांगली चव लक्षात राहते. मला तर आजवर एकाच चवीचा चहा करणं
कधी जमलं नाही जर तुम्हाला जमत असेल तर नक्कीच कळवा, अगदी, गॅसची शेगडी कोणती आहे, यापासून, पाणी किती डिग्रीला
उकळायचं ते, साखर कितव्या मिनिटाला घालायची आणि गार दुध
घालून चहा परत उकळायचा, कि गरम दुध घालून चहा
बंद करायचा असे छोट्यातले छोटे बारकावे देखील सांगालच. तोवर मी माझ्या चहाच्या
चवीचा नवीन प्रयोग करते. तसा चहा करणं सोपेच आहे, फक्त चवीचे तेवढं आपण बाजूला ठेवूया, हो ना.
चहा खुलतो तो कंपनीमुळे सुद्धा :-) तेव्हा चहा छान व्हायचा असेल तर मित्र / किंवा मैत्रिणी हव्यातच !!
ReplyDeleteThank you...
DeleteVery Nice
ReplyDeleteenjoyed the article :)