सखा आषाढ श्रावण…



दारी आषाढ श्रावण
रुणझुणती पैंजण
वाजे पाऊल सणांचे
मनी आनंदा उधाण ।।

आषाढाचा कृष्णमेघ
   निळ्या आभाळी झुलतो
कविश्रेष्ठाचा आठव
  'मेघदूत' रूप घेतो ।।

युगे युगे वाट पाही
धन्य सावळी विठाई
ओढ जागता अंतरी
वारी पंढरीसी जाई ।।

ईशकृपाप्रसादाने
  भेट सद्गुरुंची घडे
   पूर्णचंद्राच्या साक्षीने
      चित्त आत्मरूपी जडे ।।

गर्द अंधार मायेने
येता क्षणिक झाकोळ
अवसेचा लख्ख दीप
वाट दाखवी निर्मळ ।।

चिंब आसमंत होई
रंग सृष्टीचा गहिरा
देई नवसंजीवनी
    सखा श्रावण साजिरा ।।

कथा वारांच्या सुरस
ऐकताना चित्त दंगे
सदाचार, सद्गुणांचा
वसा सकलांसी सांगे ।।

पूर्णचंद्र या मासीचा
  गाई कर्तव्याची गाणी
सदा भ्रातृप्रेमासंगे
    म्हणे जपा देववाणी ।।

काय अष्टमीचे बाई
सांगू कौतुक आगळे
बालरूपे अंकी खेळे
परब्रह्म ते सावळे ।।

मासद्वयी चोहीकडे
रम्य सुखद सोहळा
जीवा शिवाचे अद्वैत
     अवघा रंग एक झाला ।।

 मानसी फडके



1 comment: