वारी


हातात टाळ घ्या, खांद्यावर वीणा घ्या; हसत नाचत पंढरीला जाऊया'
किंवा
'पुढे चाले ज्ञानेश्वर,मागे मुक्ताई सुंदर'
साध्या सोप्या शब्दातील श्रद्धेने ओतप्रेत भरलेले हे अभंग. सारं वातावरण कसं एका परमानंदाच्या उच्च पातळीवर नेऊन पोहचवणारं.'विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म'. एक भक्तमेळा..एक प्रकारचा ऊर्जा-स्त्रोत, अरुपात रुप पाहण्याची उर्मी घेऊन निघालेला हा जनसमुय. या सार्‍या भक्तांची, वारकर्‍यांची इच्छा एकच... त्या कानडा विठूरायाचे दर्शन. डोळे भरून 'याची देही याची डोळा' पाहण्याची त्रिवार इच्छा. हाच तो कपाळाला बुक्का, गळ्यात तुळशीमाळा घालणारा.'कटेवरी कर विटेवरी ऊभा' असा, तुमच्या आमच्यातीलच एक भासावा असा जनसामान्याचा त्राता..पंढरीचा विठ्ठल. ओबडधोबड दगडात कोरलेला,तथाकथीत आखीव्-रेखीवपणा नसलेला, साध्या वेषातील पाठीराखा म्हणजे तो विठुराया. 

या वारीला ‘‘प्रथमपुरूषी एकवचन’’ कधीच नसते असते ते फक्त ‘‘ बहुवचन- आम्ही!’’ वारीतल्या वारकर्‍याला स्वतःचे असे ‘‘मीपण’’ ऊरत नाही. त्यामूळे तो विठ्ठल केवळ एकट्याचा न राहता सर्वांचा होतो, आमचा होतो, जनसामान्याचा होतो. म्हणूनच की काय, त्याला जसे 'विठ्ठल-रुक्माई' रुचते तसे 'इठ्ठल-रखमाई' पण रुचते. 'ज्ञानदेव्-तुकाराम' आवडते तसे 'ग्यानोबा-तुकाराम' ही आवडते. आंतरिक ओढिला कोठे असते, भाषेची शुद्धता?  ती ओढ असते या अंतरीची त्या अंतरीशी!!

या मेळ्यात ज्ञानदेव आहेत, तुकाराम आहेत, चोखामेळा आहेत, गोरा कुंभार आहेत, नरहरी सोनार आहेत, नामदेव महाराज, जनाबाई,आहेत. या विठूरायाला कोणतेही उपचार नकोत्..रीवाज नकोत. तो सदैव उभा भक्तासाठी. दिंडी चालली की आपण निघायचे, वाट दाखवणारा तो आहे. तो खांद्यावरही घेतो, तो बोटही धरतो हीच धारणा. त्यामूळे ऊन्-वारा-पाऊस कशाचीही तमा न बाळगता, वयाचा विचार न करता, तहान भूक हरवून एकाच दिशेने, एकाच ध्येयाने निघालेली आनंदयात्रा म्हणजे वारी. या वारीत सारे एकचं. 'भेदाभेद अमंगळ' ही वृत्ती प्रत्येकाच्या खोल अंतरंगात रुजलेली. वारीतला प्रत्येक वारकरी म्हणजे माऊलीचे रूप. माऊली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली. माऊली म्हणजे आई, करुणासागर, प्रेम..चराचरामध्ये ईश्वराचे अस्तित्व,प्रत्येक आत्म्यात परमात्मा आहे अशी धारणा. त्यामूळेच समोरची व्यक्ती कोणी का असेना..सान-थोर, गोरा-काळा, उच्च्-नीच्..कोणताही भेदभाव न बाळगता त्याला माऊलीचे रूप द्यायचे. त्यामूळे ईथे प्रत्येकजण दुसर्‍याला 'माऊली' म्हणून संबोधतो..टाळ-मृदुंग बोलू लागतात, पताका नाचू लागतात. 



काम, क्रोध, मोह, मत्सर सारखे षडरीपू कापरासारखे केव्हाच जळालेले असतात. फक्त उरलेली असते समईतील ज्योत. 'आत्मरत' असे काहीच नसते; जे असते ते 'आत्मवत'. वारी सोहळा आहे एकदा तरी अनुभवा असा नि एकदा अनुभवला की वारंवार अनुभववासा वाटणारा. वारी सोबत जाणे हे एक प्रकारचे वेड आहे. वारीला कोणतेही शासक नाही शासन नाही. चाकोरीत बसणारे कायदेकानून नाहीत, लिखीत नियमावली नाही. मग ही परंपरा एवढी टिकून कशी आहे? काय असावे ह्याचे कारण्..मला वाटते कारण फक्त एकच 'ध्येयासक्ती'--विठूवरचे प्रेम.
ह्याची देही, ह्याची डोळी
ही अनुभूती घ्यावी. 

'आनंदाचे डोही आनंद तरंग' म्हणजे नक्की काय, यासाठी एकदा तरी वारीला यावं असं लोक म्हणतात, मी ९४ते २००५ पर्यँत सकाळ मधील वारीचे फोटो फक्त बघायचो,
पण कधी पायी वारी केली नाही, अगदी माझ्या कंपनी जवळून पालखी  जायची तरी.
पण 2006 मध्ये पहिल्यांदा स्वतःला अनुभवण्याचे ठरवले,  आणि तेव्हापासून हा एक
वेडापीसा करणारा छन्द लागला, तहान भूक हरवून तल्लीन होण म्हणजे याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.

मी तसा फार आस्तिक नाही, किंवा नास्तिक ही नाही. पण मला कोणत्यातरी आनंदात एक प्रसन्न आणि ऊर्जा देणारी चेतना जेव्हा दिसते ना तेव्हा तो आनन्द बघायला फार आवडते. 

आपण वारीला जातो नि आपण त्या वारीचेच होतो.'भगवा पताका वैष्णव नाचती, पंढरीचा महीम वर्णावा किती'.
आयुष्यात स्वतःला विसरवणारे भाग्यवान क्षण नशीबानेच गवसतात. हा अनुभव केवळ शब्दात वर्णन करता येणे शक्यच नसते.हे सारे शब्दातीत आहे..एकदा तरी तुकोबा-माऊलीचे दर्शन घ्यावे... डोळ्यातून कृतार्थतेचे अश्रू ओघळतात.. त्या प्रत्येक थेंबावर असतो तो त्या जगजेठ्ठीचा आशीर्वाद!!

                           श्री विवेक ताटके


1 comment: