रसिकांना सतत हसवत ठेवणे हेच माझ्या आयुष्याचे ध्येय
आहे हे ठासून सांगणाऱ्या श्री प्रशांत दामले यांच्या या ध्येयाचा प्रत्यय बंगलोर
मधल्या मराठी रसिकांनी नुकताच पुरेपूर अनुभवला.
१४ जानेवारी २०१८ सकाळी१०.३० ते १.३० या वेळात अगदी श्वास घ्यायला सुद्धा फुरसत न
देता सतत हसवत ठेवणारे असे सध्या प्रचंड गाजत असलेले मराठी नाटक साखर खाल्लेला
माणूस बंगलोरमध्ये सादर झाले.
जानेवारीला संक्रांतीचा वीकेंड आणि मित्रमंडळाचा संक्रांत विशेष कार्यक्रम हे समीकरण गेले कित्येक वर्ष अगदी ठरूनच गेलेले आहे. या वर्षी कोणता कार्यक्रम ठरवायचा याचा विचार सुरू असतानाच साखर खाल्लेला माणूस हा पर्याय समोर आला आणि पूर्ण समितीचाच उत्साह वाढला. दुधात साखर म्हणजे इन्फोसिस फाऊंडेशनच्या माननीय सुधाताई मूर्ती यांनी या नाटकाला स्पॉन्सरशिप दिली. रसिकांचा प्रतिसाद तर इतका उत्तम मिळाला की पंधरा दिवस आधीच नाटक हाऊसफुल्ल झाले. बऱ्याच रसिकांची तिकिट न मिळाल्यामुळे निराशाही झाली.
आजवर प्रेमळ नवरा किंवा बाप अशासारख्या भूमिका साकारून आपल्या भूमिकेतून प्रेक्षकांना हसवणारे प्रशांत दामले या नाटकात काहीसा चिडचिडा नवरा थोडासा अहंमन्य बाप सादर करतात. पत्नीच्या भूमिकेत शुभांगी गोखले यांनी त्यांना खूपच छान साथ दिली आहे. मधुमेहासारख्या रोगाचे निदान झाल्यावर त्यावर उपायांसाठी प्रत्येकाकडून मिळणारे उपदेशामृत व त्यामुळे आणखीच चिडचिडा झालेला विलास देशपांडे अर्थातच प्रशांत दामले यांनी आपल्या संवादफेकीतून, बॉडी लँग्वेज मधून मुख्यता टायमिंग साधून नाटक वेगळ्याच दर्जाला नेले आहे. कुठल्याही उपायाला आपला बाबा भीक घालत नाही हे लक्षात आल्यावर त्यांची मुलगी रुचा ही स्वतः प्रेग्नंट असल्याचा बॉम्ब टाकले आणि मग मात्र विलास देशपांडे चांगलेच हादरतात प्रथम नाकारलेल्या डॉक्टरला अखेरीस जावई करून घ्यायला तयार होतात.
लेखक विद्यासागर अध्यापक यांनी मधुमेह केंद्रस्थानी ठेवून लिहिलेलं हे नाटक बँक कॉमेडी शैलीतलं आहे. यामध्ये मधुमेहाबद्दल जागृती वगैरे करण्याचा पवित्रा न घेता त्याची गंभीरता हसत खेळत लोकांच्या मनावर बिंबविण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे नाटक मधुमेहाबद्दल असलं तरी त्याबद्दल बोधामृत पाजणारे अजिबात नाही. दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी वास्तववादी शैली वापरल्यामुळे विनोद थिल्लर वाटत नाहीत. अशोक पत्कींचं संगीत नाटकाला वेगळ्या उंचीवर घेऊन जातं. प्रशांत दामले हे उत्तम अभिनेत्यांबरोबर उत्कृष्ट गायकही आहेत हे मराठी प्रेक्षकांपर्यंत पुन्हा एकदा पोहोचल.
प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद, हशा, टाळ्या यामुळे नाटक उत्तरोत्तर रंगत गेलं. प्रेक्षकांच्या विशेष आग्रहामुळे नाटकानंतर प्रशांत दामलेंनी गायलेले गीत, हाऊसफुल्ल प्रेक्षागृहा बरोबर घेतलेला फोटो व सर्वात विशेष म्हणजे माननीय सुधाताईंचे आशीर्वाद यामुळे नाटकाचा शेवटही अगदी गोड झाला.
स्वाती ब्रह्मेंचे मधुर निवेदन, तिळगुळ, व मध्यंतरात मराठी पदार्थांची रेलचेल यामुळे नाटकाची रंगत अधिकच वाढली.
या कार्यक्रमासाठी विशेष कष्ट घेतलेले डॉक्टर संगीता केसकर, नरेन नंदे, निना वैशंपायन व संपूर्ण मित्रमंडळ समिती यांचा दिवस तर साखर न खाता हि गोड झाला असणार यात शंका नाही.
मधुमेहावरचं इतकं गोड नाटक बंगलोरला आणून नुतन वर्षांची उत्तम सुरुवात केल्याबद्दल मित्रमंडळाचे विशेष अाभार.
अस्मिता ओक गंधाली सेवक
सर्वप्रथम इतके गाजलेले नाटक बंगलोरला आणल्याबद्दल मित्रमंडळाचे अभिनंदन ! उत्तमोत्तम कार्यक्रम करण्याची परंपरा यावेळेही राखली.
ReplyDeleteनाटकाची कथा अगदीच सुमार असूनही नाटक प्रशांत दामलेंनी पूर्णपणे स्वतःच्या खांद्यावर तारून नेले !
मूळ संकल्पना चांगली असूनही, मध्यंतरानंतर तर कथा पूर्णपणे भटकत गेली आणि शेवट अगदी माहित असल्यासारखा झाला!
पण सर्वच कलाकारांनी आपली कामे उत्तम केलीत !