कौतुक पहावे करून...

'फारच सुंदर दिसते आहे!' 
'किती छान झाली आहे भाजी, तुझ्या हाताला फारच छान चव आहे.'
'झकास डान्स केला आज तू!'
'तिचा आवाज खूप गोड आहे!' 

असे कौतुकाचे शब्द ऐकले की नव्याने उत्साह येतो आणि आपण जे काम करतो ते अधिकच चांगलं करतो किंवा अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करतो. कौतुक ऐकायला कोणाला नाही आवडत? पण मनमोकळं कौतुक करणारी मंडळी मात्र फारच थोडी असतात. 
'यात काय वेगळं? आम्ही पण असंच करतो', 'आमच्या अमक्याचा तमका याच्यापेक्षा छान करतो' असं बोलणारी मंडळी मात्र आपल्या आजूबाजूला खूप असतात.

दुसऱ्याचं कौतुक करताना का काटकसर करायची हे न उमगलेलं कोडं आहे. कौतुक करायला काही खर्च करायची गरज नसते, पण मनाची श्रीमंती पाहिजे. आता कधी कधी असंही होतं की आपण एखाद्याचं कौतुक करायला जातो आणि आपल्याच अंगलट येतं.

दुसऱ्याला उगीच असं वाटतं की आपण त्याला हिंणवतो आहे. काही लोकांना तर दुसऱ्याचं कौतुक केलेलं पचतच नाही. कौतुक सकारात्मकपणे स्वीकारता येणं पण एक कलाच आहे.  'You are looking awesome!', 'तुझ्या भाज्या नेहमीच चविष्ट असतात' आपण कौतुक करायचं आणि समोरून उत्तर येतं, 'काहीही बोलतेस, उगीच हरभऱ्याच्या झाडावर चढवू नको, माझं वजन वाढेल एवढं कौतुक ऐकून'. आता हेतू फक्त कौतुक करणं हाच होता ते ओळखून तसा सकारात्मक प्रतिसाद द्यायला पाहिजे की नाही? अशा वेळी 'thanku' असाच  प्रतिसाद द्यायला हवा.

काहीही म्हणा, असंख्य प्रकारच्या  व्यक्ती आपल्या आजूबाजूला असतात; त्यातील काही मात्र आपलं कौतुक मनापासून करत असतात. आपणही त्यांचा आदर्श घेऊन योग्य त्या वेळी योग्य त्या व्यक्तीचं कौतुक करायला पाहिजे, जेणेकरून त्या व्यक्तीला ते काम करण्यात किंवा नवीन कल्पना अमलात आणण्यात हुरूप येईल.

-- वंदना देशपांडे

1 comment:

  1. Kharray, we should be lavish in praise and miser in criticism

    ReplyDelete