जागतिक मराठी आजी आजोबा

सत्तरीच्या आसपास वय असलेले, तरीही तब्येती उत्तम राखलेले आजी आजोबा कुठल्याही ट्रॅव्हल कंपनीबरोबर परदेश सहली करताना हल्ली सर्रास सगळीकडे दिसतात. अगदी अमेरिकेपासून ऑस्ट्रेलियापर्यंत...
सांसारिक जबाबदाऱ्या पार पडून स्वतःसाठी थोडे जगू पाहणारे हे आजीआजोबा मला  नेहमी फार भावतात.

त्यांच्यातल्या एकाला छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन येत असते. आणि त्या जोडीदाराला सांभाळून इमिग्रेशनचे फॉर्म्स भरणे, पासपोर्टवरचे शिक्के तपासून घेणे, बेल्टवरच्या आपल्या बॅग्स ओळखणे ही कामे दुसरा जोडीदार लीलया पार पडत असतो.

आजींना चालण्याचा कमीत कमी त्रास पडावा याची दक्षता आजोबा कायम घेत असतात. आणि मग जिथे मिळेल तिथे आजींना बसायची जागा शोधून देत असतात... स्वतः उभे राहून.

टूर गाईडचा प्रत्येक शब्द ही मंडळी शाळेच्या शिक्षकांच्या सूचनांच्या आज्ञाधारकपणे पाळतात. सामानाचे वजन २० किलो असायला हवे हे कळले आणि वजन १५ किलोच्या पुढे काही ग्राम गेले तरी ते थोडे सामान कमी करतात. अनोळखी देशात जाताना फजिती नको हा हेतू.

लॉबीमध्ये सकाळी ८ वाजता भेटायची वेळ दिली असेल, तर आजोबांना सकाळी ६ लाच उशीर झालेला असतो. लवकर उठून आन्हिके  आवरून, सकाळची स्तोत्रे म्हणून, बॅगचे कुलूप, पासपोर्ट आणि फॉरीन करन्सीचे पाकीट सुमारे ५-६ वेळा चेक करून, एकमेकांना ’खोलीचे दार घट्ट लागले ना’, हॉटेलचे कार्ड कुठल्या पिशवीत ठेवले याची तपासणी करायची आठवण करून ते ७.४५ च्या ठोक्याला लॉबीमध्ये पोचतात.

बुफे ब्रेकफास्टमध्ये पोहे मिळाले असते तर बरे झाले असते नाही का हो? असे म्हणत ही मंडळी ब्रेड, केक अशा विलायती दिग्गजांना नाकारून नुसत्या फळांवर काम भागवतात. चहाशी त्यांचे जमलेले नसते. पण नाईलाजाने चहाचे गरम पाणी घेऊन ते सर्वांच्या आधी बस मध्ये जाऊन बसतात. ट्रीपच्या ७-८ दिवसांत हमखासपणे आजींचा एखादा उपास येतो. अशा वेळी सकाळी फलाहार आणि दुपारी घरून आणलेला बटाट्याचा चिवडा, दाण्याचे लाडू यावर परदेशात उपास चालतो.

दिवसा घरून आणलेले बेसन लाडू, चिवडा अशा पदार्थांवर वेळ मारून नेतात आणि रात्रीच्या जेवणात वरण-भातसुद्धा चालला असता की नाही हो, असे म्हणत लालभडक रंगाच्या तेलाचे तवंग असलेल्या पनीर, दाल माखनी अशा खाशा पदार्थाना सोडून साधा भात आणि रायत्याच्या दह्यावर काम भागवतात.
दिवसा बाहेर फिरताना कुठे एस्केलेटर चढायची वेळ आली तर आजोबा हमखास आजीचा हात धरतात. आणि त्याही वयात इश्श म्हणत आजी मस्त लाजतात. प्रेक्षणीय ठिकाणी त्यांच्या कॅमेऱ्याने फोटो काढून घेताना समूहगानाला उभे असल्यासारखे हात पुढे बांधून उभे राहतात. फोटो काढणाऱ्याने जवळ सरकायची विनंती केली की संकोचतात.

खरेदीच्या संध्याकाळी आजींना मुले, सुना, नातवंडे यांच्या बरोबरीने भजनी मंडळाच्या मैत्रिणी, हास्य क्लबचे सदस्य, शेजारीपाजारी अशा सर्वांसाठी काहीतरी घेण्याची इच्छा असते. आपण फॉरीनला जाऊन आलो हे सांगताना हातावर काही ठेवायला नको? नाहीतर लोक काय म्हणतील, दोघे आपापली मज्जा करून आले. आम्हाला काही आणलेसुद्धा नाही.

इतक्यात  आजोबा कुठूनसा एक कॅलक्युलेटर शोधून आणतात. ट्रॉलीमधल्या प्रत्येक वस्तूवरच्या किमतीच्या लेबलचे गुणाकाराचे गणित जमले की, अग, हे हल्ली आपल्याकडे मिळायला लागलेय की, असे म्हणत निम्मी ट्रॉली रिकामी करतात. थोड्या वाटाघाटीनंतर २ मोठ्या चॉकलेटच्या पाकिटांची खरेदी होते. आणि घरी गेल्यावर त्याचे कसे वाटप करायचे याची चर्चा सुरू होते. विशेष म्हणजे या सर्व खरेदीमध्ये त्या दोघांनी स्वत:साठी काहीच घेतलेले नसते. आयुष्याच्या संध्याकाळी जोडीदाराचा हात हातात घेऊन जग फिरताना पुन्हा त्या जागेची आठवण म्हणून सौव्हेनियर घेण्याची गरजच पडलेली नसते. 


या सर्व छोट्या छोट्या प्रसंगांमध्ये बघण्यासारखे असते, ते त्यांच्यातले सामंजस्य, विश्वास. व्हाँट्स अॅपवर झालेल्या मेसेजपर्यंत सर्व गोष्टींची चर्चा, छोटे छोटे प्रश्न आणि त्यावर चर्चा करून केलेले उपाय सारेच मधुर. त्यातच त्यांच्या ४०-४५ वर्षांच्या दीर्घ सहजीवनाचे रहस्य दडलेले असते. अशी जोडपी भले लॉन्ग ड्राईव्ह किंवा कॅण्डल लाईट डिनरला गेली नसतील किंवा त्यांनी एकमेकांना कधी ‘आय लव्ह यू!’ म्हटले नसेल. They may look perfectly unromantic but  to me they are the most romantic couples! :)


-- विनया रायदुर्ग

1 comment:

  1. एक नंबर!!! अतिशय सुंदर!!!

    ReplyDelete