बालकाचा पहिला वाढदिवस आपण संस्कारमय पद्धतीने
साजरा केला. त्याला निरांजनाने ओवाळून त्याच्या मंगलमयी भावी आयुष्यासाठी भरभरून शुभार्शिवाद
दिले. यापुढील टप्पा त्याचे शारिरिक आरोग्या बरोबर मानसिक आरोग्य जोपासायचा.
बालक दोन वर्षांचे झाले की घरामध्ये वेगवेगळ्या शाळांबदल चर्चा सुरु होते. मग एखादे गोंडस इंग्रजी नाव असणाऱ्या बालवाडी मध्ये “A” for Apple शिकायला चिमुकल्याची रवानगी होते. बालक तीन वर्षाचे होते न होते तोच homework sheets नामक गृहपाठ घरी येऊ लागतो. समस्त पालकवर्ग त्याची पूर्तता करण्यासाठी चिमण्या जीवाला वेठीस धरतात, हा झाला सद्य परिस्थितीतला विद्यारंभ! हा अक्षरारंभ अथवा विद्यारंभ पूर्वजांनी अगदी सोप्या संस्कारामध्ये गुंफला. बालक तीन वर्षाचे झाले की उत्तम दिवस बघून पाटीवर सरस्वती काढावी , एका ताम्हणात तांदूळ घेउन त्यावर बाळाचे बोट धरून ओम लिहावे. पाटीवर पाहिले मुळाक्षर लिहायला बालकाला सहाय्य करावे. मनोमन त्याच्या उत्तम विद्याभ्यासाठी देवाजवळ प्रार्थना करावी. अशा संस्कारमय अक्षरारंभामुळे बालकाला अभ्यासात उपजत रुची निर्माण होते.
पुढील संस्कार आहे " चौल " अथवा
" चुडाकर्म ". चूडा म्हणजे बालकाच्या डोक्यावरील शैडीचा भाग. ह्या संस्कारामुळे बालकाला तेज व आरोग्य प्राप्ती होते तसेच
त्याची ज्ञान ग्रहणाची क्षमता वृध्दींगत होते. सूत्रकारांनी हा संस्कार पाहिल्या, तिसऱ्या अथवा पाचव्या
वर्षी करावा असे नमूद केले आहे. सध्याच्या काळात चौल हा उपनयन विधिचा भाग झाला आहे.
बालक आठ वर्षाचे होताच घरात मुंजीचे वारे वाहू लागतात. निमंत्रण पत्रिका, कपडे, कार्यालय, मेनू ह्यांच्या चर्चेला अगदी ऊत येतो. हा समारंभ किती traditional करता येईल ह्याची खबरदारी घेण्यात
येते. उदाहरणार्थ बटुच्या आईला नऊवारी, नथ, वाकी. बटुला भिकबाळी, पगडी इत्यादी इत्यादी. ह्या वरपांगी गोष्टींच्या आतील उपनयन संस्कार काय आहे ते बघू या.
“ उप + नी” ह्या संस्कृत धातू चा अर्थ आहे ‘जवळ नेणे’. ‘उपनयन’ म्हणजे विद्याभ्यासासाठी गुरुच्या सानिध्यात नेणे. जगातील सर्व धर्मामध्ये
हा विधी ह्या ना त्या रूपात आढळतो. उपनयन संस्काराला मौजीबंधन, बटुकरण, व्रतबंध अशी विविध नावे आहेत. ह्या नावांचा अर्थ समजावून
घेऊ या.
उपनयन संस्कारात बटुच्या कमरेला मौज नावाच्या गवताच्या तीन वेढयांची मेखला बांधतात. पुढील आयुष्यात
येणाऱ्या कष्टांसाठी त्याने कंबर कसून सामोरे जावे हा त्यामागील हेतू. ह्या वरून शब्द
आला ‘मौजीबंधन’. ‘व्रतबंध’ म्हणजे ब्रम्हचर्य तसेच अनेक व्रतांचे कडक पालन. पौगंडा अवस्थेत
बालकाचा तोल कुठेही ढासळू नये ह्याची ही खबरदारी! उपनयन संस्कारा नंतर बालकास बटू हे
नामाभिधान मिळते म्हणून ‘बटूकरण’.
गृहस्थाश्रमात पदापर्ण करण्याचा संस्कार म्हणजेच विवाह. व्यवहारात लग्न
आणि विवाह हे समानार्थी शब्द आहेत पण संस्कृत मध्ये व्युत्पत्ती च्या दृष्टीने त्यांचे
अर्थ पूर्ण वेगळे आहेत. ‘लग्न ( लग्-लगती )’ म्हणजे केवळ " जवळ येणे". ह्यामध्ये स्त्री
पुरुषाने एकमेकांच्या सानिध्यात येणे इतकाच संकुचित अर्थ आहे. तर ' विवाह ( वि+ वह् )’ ह्यामध्ये " उदात्त वृत्तीने अंगीकृत करणे "
असा विशाल दृष्टीकोन आहे. लग्नात एकमेकांची उणीदुणी काढणे होते पण विवाह संस्कारामध्ये
एकमेकांचे गुणग्रहण आणि गुणसंवर्धन होत रहाते. विवाह जेव्हा देव. अग्नी, ब्राम्हण यांच्या साक्षीने आणि जेष्ठ मंडळींच्या
उपस्थितीत होतो तेव्हा परमकल्याणदायी होतो. विवाहसंस्कार हा अनेक संस्कारांची गुंफलेली माळ
आहे. त्याचा
परामर्श पुढील भागात.
- आरती जोशी
Uttam va mahiti purvark lekh.
ReplyDelete