ताणतणाव आणि आपण


केस 1
३५ वर्षांचा सतीश एका  मल्टिनेशनल  बँकेमध्ये एक्झिक्युटिव्ह पदावर काम करत आहे. दोन वर्षांपूर्वी त्याला या पदावर बढती मिळाल्याचा कोण आनंद व अभिमान वाटत होता! पण गेल्या सहा महिन्यांपासून काहीतरी बिनसले आहे. त्याचा दिवसच मुळात ७.३० वाजता सुरू होतो ते त्याच्या बॉसने काल आठवण करून दिलेल्या डेडलाईन्सने! उठल्यापासूनच त्याला हताश, निरुत्साही वाटू लागले आहे. कसेबसे स्वतःचे आवरून, घाईगडबडीत कसातरी नाश्ता पोटात ढकलून तो नऊ वाजता धापा टाकत बॅंकेत पोचतो खरा, पण त्याला पुढचा सगळा दिवस अक्षरशः अंगावर आल्यासारखा वाटतो. त्याला पाहिल्यासारखे ना क्लायंटशी संवाद साधावा वाटतोय ना ऑफिसमधील सहकाऱ्यांशी सल्लामसलत करावीशी वाटते आहे . एखाद्या चुकलेल्या टार्गेटबद्दल मीटिंगमध्ये खुलासा करावा लागलाच  तर त्याला कसे तोंड द्यावयाचे या चिंतेने त्याचे डोके चढू  लागते, छाती धडधडू लागते, कामात लक्ष लागत नाही. लंच भरभर उरकून सतीश  परत आपल्या केबिनमध्ये येऊन बसतो खरा, पण तो स्वतःवरच इतका कातावलेला असतो की पुढचे काम करायचा ओढूनताणून आणलेला उत्साहही निघून गेलेला असतो. वैतागून तो कॅन्टीनमध्ये येतो आणि अस्वस्थतेने दोन सिगारेट्स भसाभसा ओढतो. घरी येतानाही तो त्याच मूडमध्ये असतो. त्याची पत्नी अगत्याने त्याला ‘हेल्दी स्नॅक्स’ व चहा आणून देते. छोटी मुलगी अवतीभोवती किलबिलत असते. पण त्याला क्षणी त्याला काही वेळ एकटे राहण्याव्यतिरिक्त काही नको असते. याबद्दलपण  त्याला दुःखीकष्टी व अपराधी वाटत असते. तो मनाशी म्हणतो ‘च्यायला काय आपली जिंदगी... आपल्याबरोबरचे बाकीचे कसे बिनधास्त असतात.आपला एवढा चांगला जॉब आहे, फॅमिली छान आहे; पण आपण मात्र सदानकदा त्रस्त..। जणू काही वाघ पाठीमागे लागलाय आपल्या... ऐन पस्तिशीत आपल्यासोबत आहे कोण तर  नुकतेच निदान झालेले ब्लडप्रेशर... जोडीला अॅसिडिटी व  पाठदुखी आहेतच!

केस 2
अदिती एक ४० वर्षांची अत्यंत टापटिपीने व निगुतीने संसार करणारी गृहिणी. पहिल्यापासून मस्त संसार करण्याचे ठरविले असल्याने संधी मिळूनही तिने कधी नोकरी केली नाही. MIDC मध्ये  स्वतःचे छोटे युनिट उत्तम चालवणारा नवरा व  १५ व १३ वर्षांच्या मुलांचे सारे काही अगदी ‘परफेक्ट’ करताना तिला अगदी कृतकृत्य वाटे. गृहिणीपण व आईपण यात तिने त्यांना तक्रार करायला अजिबात जागा ठेवली नाही. ‘मी नसले  तर त्या तिघांचे अजिबात पानही हलत नाही’ याचे तिला किती कौतुक व अभिमान असायचा! पण गेल्या वर्षात तिची अगदी छोट्या छोट्या गोष्टीनी चिडचिड होत आहे. 'इतकी वर्षे झाली लग्नाला पण नवऱ्याला साधा रुमाल शोधून द्यावा लागतो; मुलगी १५ वर्षांची आहे, पण तिला असे वाटत नाही की आपण आईला थोडी तरी मदत करावी; मुलाला प्रोजेक्ट करताना पूर्णवेळ काय आई बरोबर लागतीय... शी: त्यापेक्षा आपण नोकरी केली असती तर निदान यांना शिस्त तरी लागली असती... आपल्याच संस्कारांत खोट आहे...’ अशा विचारांनी तिच्या मनात अपराधीपणा, खंत, उदासपणा, राग, वैफल्यग्रस्तता यांनी नुसते थैमान घातले आहे. झोप शांत लागत नाही, मन सतत अस्वस्थ राहते  म्हणून अदितीला तिच्या फॅमिली डॉक्टरनी योगा, मेडिटेशन करायला सांगितले आहे. ते करूनही तिला शांती मिळत नाहीये.

केस 3
अमोघ एका नामांकित कॉलेजमध्ये इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असलेला एक हुशार व कष्टाळू युवक. लहानपणापासून त्याच्याकडून घरात व शाळेत  परीक्षा, स्पर्धा, यश, चांगले पॅकेज, सेटलमेंट याबद्दल सतत अपेक्षा. तसे पाहता आतापर्यंत पालक, शिक्षक यांचा विश्वास त्याने सार्थही ठरवला होता. आता एम टेकला नावाजलेल्या आयआयटीमध्ये प्रवेश मिळवलाच पाहिजे या ध्यासाने झपाटून अभ्यासाला लागण्याचे त्याने पक्के केले खरे... पण सहा महिन्यांत त्याच्या लक्षात आले की आपण क्लास तर  वेळापत्रकानुसार करतो आहोत, विषय समजावयासही तशी अडचण येत नाहीये, पण आताशा त्याला  अभ्यासच नकोसा वाटू लागला आहे. अभ्यासाचे पुस्तक डोळ्यासमोर घेतले की डोक्यात अभ्यास सोडून इतरच सटरफटर विचार येतात. दीड वर्षानंतर होणाऱ्या ‘गेट’ परीक्षेची कमालीची भीती वाटू लागली. तशी भीती आजपर्यंत त्याने कधी अनुभवलीच नव्हती. आपल्याला हव्या त्या संस्थेत प्रवेश मिळाला नाही तर आपले पालक व शिक्षक यांना काय वाटेल, मग आपल्या करियरचे कसे होणार या चिंतेने त्याचे मन पार ग्रासून गेले... ना त्याचे कॉलेजमधे मन लागे ना मित्रमैत्रिणींची संगत हवीशी वाटे. त्याचा स्वभाव हल्ली फारच चिडचिडा झालाय असे त्याच्या ग्रुपचे म्हणणे आहे. मित्र त्याला ‘चिल कर यार... आतापासून काय विचार करतोस गेटचा’ असे सांगून त्याचे टेन्शन कमी करण्याचा प्रयत्न करतात... बियर घेतली तर टेन्शन दूर होते असे कुठूनतरी ऐकल्यामुळे त्याने तो प्रयोग पण करून पाहिला। पण उलट त्याचे मन  अपराधीपणा, औदासिन्य, चिंता, हताशपणा या चक्रात अजूनच अडकत गेले. त्याचा परिणाम म्हणजे त्याचे तिसऱ्या वर्षीच्या त्या  टर्मचे डिस्टिंक्शन चुकले.

वाचकहो, ही आपल्या आजूबाजूलाच घडणारी काही प्रातिनिधिक उदाहरणे! प्रसंग व व्यक्ती थोड्या फार बदलू शकतात, पण यातील एक  सूत्र  मात्र समान आहे. ते म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल माणसाला वाटणारा कमालीचा ताण। आजकाल मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातच नव्हे तर शारीरिक आरोग्याची चिकित्सा करणारे डॉक्टर्स, मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या, शाळा-कॉलेजेस, वर्तमानपत्रे, पालक-शिक्षक ग्रुप्स, महिला मंडळे अशा  वेगवेगळ्या पातळीवर ताण-तणाव नष्ट करण्यासाठी कार्यशाळा, लेक्चर्स, लेख, मार्गदर्शन यांना अगदी बहर आलेला दिसतो. प्रस्तुत लेखातसुध्दा  आपण ताणतणाव कसा निर्माण होतो, त्याचे काय परिणाम होतात, त्यावर उपाय काय अशा गोष्टींची थोडक्यात चर्चा करणार आहोत, पण सरधोपट मार्गाने नव्हे. 
‘आपल्या आजूबाजूच्या सत्य किंवा काल्पनिक परिस्थितीला आपल्या शरीर व मनाने दिलेला प्रतिसाद म्हणजे ताण’ अशी ताणाची सोपी व्याख्या करता येते . ताणाबद्दल दोन महत्त्वाची सत्ये आपण समजून घेतली पाहिजेत, ती म्हणजे ताण हा सर्वांनाच  असतो व ताण हा आवश्यकही  असतो. आता  तुम्ही म्हणाल, हेच सांगायचे तर मग एवढ्या लांबलचक प्रस्तावनेची तरी काय गरज होती? पण मंडळी, या वरील सत्यात अजून दोन  उपसत्ये  दडलेली  आहेत. ती  म्हणजे बराचसा ताण हा आपणच निर्माण केलेला असतो व आपल्या आयुष्यातील बहुसंख्य ताणांचे आपण निश्चित समायोजन करू शकतो. 

ताण आवश्यक कसा?
जगातील प्रत्येक प्राणिमात्राला अस्तित्वासाठी काही ना काही प्रमाणात ताण हा आवश्यक असतोच.
उदा. – साधा रस्ता क्रॉस करावयाचा झाला तर आपण किमान सुरक्षितता बाळगून रस्ता ओलांडतो. ह्यालासुध्दा ‘ताण’ म्हणतात। कारण हा ताण अजिबातच नसेल तर काय होईल हो? कल्पनाही करवत नाही ना? म्हणून अशा  आवश्यक व उपयुक्त ताणाला आपण ‘EUSTRESS’ किंवा ‘चांगला ताण’ म्हणू या. आता दुसऱ्या बाजूला रस्ता ओलांडताना ‘आता  मला अपघात होणारच’ या भावनेने आपण रस्ता ओलांडायला गेलो तर काय होईल? जगाच्या अंतापर्यंत राहू दे, पण  आपल्या स्वतःच्या अंतापर्यंत आपण नक्की रस्त्याच्या एका कडेलाच उभे असू! अशा अनावश्यक व निरुपयोगी  ताणाला आपण ‘DISTRESS’ किंवा 'घातक ताण' म्हणू. विचार करा, आपल्या जीवनात काहीच ताण, कसलेच आव्हान नसते तर काय झाले असते हो? ‘कंटाळ्याचा देखील आता कंटाळा येतो’ अशी परिस्थिती आयुष्यभर सोसावी लागली असती की नाही? आणि हा ताण प्रमाणापेक्षा अति झाला तरी प्रॉब्लेम आहेच. त्यामुळे माणसाला प्रगतीसाठी मध्यम प्रमाणात का होईना पण ताण आवश्यक असतो. अशा आवश्यक ताणाची तुलना सोप्या भाषेत आपल्याला जेवणात सर्वसाधारण प्रमाणात मीठ लागते ना, तशा प्रमाणाशी  करता येईल. मीठ अजिबात नसेल तर जेवण बेचव, अळणी  असेल व खूप झाले तर जेवणाची सारी चवच बिघडवून टाकेल. म्हणून जीवन चवदार करेल एवढा ताण आपल्याला गरजेचासुद्धा आहे. 
खरे तर  ताण अगदी  उत्क्रांतीच्या काळापासून ते आतापर्यंत व पुढेही  जगण्यासाठी आवश्यक, प्रसंगी आपला जीव वाचवण्यासाठी म्हणून सर्व प्राणिमात्रांच्या हाती  निसर्गाने दिलेले साधन आहे. आदिमानवाच्या काळापासून माणूस जंगली श्वापदे, वणवे, दुसऱ्या टोळीतील हल्लेखोर इ.पासून स्वतःचा बचाव करावयाचा. त्याच्या बचावाच्या तीन पद्धती होत्या – 
 १) फाईट – जोरदार प्रतिकार करा .ते शक्य नसेल तर,
 २) फ्लाईट – तेथून पळ काढा. फाईट व फ्लाईट हे दोन्ही शक्य नसेल तर,
 ३) फ्रीझ – स्तंभित व्हा किंवा गोठून जा. 
ह्या तीनही पद्धती आदिम काळपासून माणूस स्वतःचे अस्तित्व टिकवण्यासाठी वापरत आलेला आहे. वर वर्णन केलेल्या बाक्या प्रसंगाना तोंड देण्यासाठी  आपले मन व शरीर अक्षरशः निमिषार्धात सिद्ध केले जात असते. यामध्ये मेंदूतील  पिट्युटरी ग्रंथीला संदेश जाऊन ACTH- AdrenoCorticoTropic Harmone हे हार्मोन स्त्रवले जाते. ह्या हार्मोनमुळे आपल्या दोन्ही किडनीच्या वर असणाऱ्या अॅड्रिनल ग्रंथीमधून तात्काळ Adrenalin, Noradrenalin, Cortisol ही व इतरही अनेक स्ट्रेस हार्मोन्स आपल्या रक्तात ओतली जातात. त्यामुळे आपला मेंदू व शरीर धोक्याला सामोरे जाण्यासाठी क्षणात सज्ज केले जाते. कसे ते पहा...
धोक्यावर विचार करण्यासाठी  मेंदू  एकदम दक्ष (alert) होतो, भरभर विचार करून पुढील प्रतिसाद देण्यासाठी हाता-पायांचे स्नायू सज्ज होतात, मेंदूला लिव्हरकडून साखरेचा इमर्जन्सी पुरवठा केला जातो. रक्तवाहिन्या आकुंचित पावून काही काळापुरते ब्लडप्रेशर वाढते, श्वास व छातीचे ठोके जोरात चालतात,  जेणेकरून मेंदू व स्नायूंना अधिक ऑक्सिजन व रक्तपुरवठा होईल. आपल्या पचनसंस्था व इतर अवयवांमधील रक्त मेंदू , हृदय व स्नायूंकडे वळवले जाते. जेणेकरून आणीबाणीला तोंड देण्याचे त्यांचे अधिक महत्त्वाचे  काम नीट करता यावे. डोळ्याच्या बाहुल्या विस्फारल्या जातात, अंगावरील केस ताठ होतात... असे सगळे बदल फक्त आठ ते दहा सेकंदांत शरीरात होतात! पण आदिमानवाच्या काळात, त्याला आत्तासारख्या मानसिक चिंता नसल्यामुळे, हे सर्व शारीरिक (मेंदूसह) बदल  ताणजन्य परिस्थिती निघून गेल्यावर काही काळानंतर पूर्ववत पण होत असत, होणे इष्टही असते. त्यामुळे ताण हा जणू अस्तित्वाची लढाईच म्हणा ना! म्हणूनच ताण हा आवश्यक असतो ते आपणास सहज पटेल. कोणत्याही विपरित परिस्थितीला अशा ‘फाईट-फ्लाईट-फ्रीझ’ अशा पद्धतीने प्रतिसाद देण्याची प्रक्रिया मानवाच्या उत्क्रांतीच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून मानवी मेंदूत अगदी घट्ट रुतून बसलेली आहे. ह्या तीन प्रतिक्रिया बहुतांशी मानवाच्या मेंदूतील अगदी पुरातन मेंदूमार्फत होतात, कारण संरक्षण हे त्यांचे मुख्य कामच असते. सजीवांच्या उत्क्रांतीमध्ये मानवाच्या  मेंदूमध्ये बराच  बदल होऊन नवीन, विवेकी मेंदूचा विकास झपाट्याने  झाला. ह्या  नवीन मेंदूमुळेच मनुष्याला ‘मनुष्यपण’ आहे! कल्पना,नवनिर्मिती, तर्क, सारासारविवेक, निर्णयक्षमता, सजगता अशा कित्येक देणग्या  या नवीन मेंदूच्याच आहेत! या नव्या मेंदूची क्षमता अक्षरशः कल्पनातीत आहे. पण तोच काही अंशी आधुनिक मानवाच्या परिस्थितीला जबाबदार आहे असेही म्हणता येईल. प्रत्येक कठीण परिस्थिती जणू आदिमानवाच्या काळातील ‘डू ऑर डाय’ प्रकारचीच परिस्थिती असल्याचे हा ‘विचारी’ मेंदू स्वतःला सांगत राहतो; व जुन्याच पुरातन मेंदूच्या साहाय्याने त्याला प्रतिसाद देत राहतो! 

‘सत्य वा काल्पनिक परिस्थितीला आपल्या शरीर व मनाने दिलेला प्रतिसाद म्हणजे ताण’ ही व्याख्या आपण पाहिलीच आहे.आता हा प्रतिसाद समयोचित व प्रसंगानुरूप असेल तर तो ‘चांगला  उपयुक्त  ताण’  Eustress म्हणता येईल. पण तो जर त्या प्रसंगानुरूप नसेल व इष्ट काळापेक्षा जास्तच टिकणारा असेल तर तो ‘वाईट वा घातक ताण’- Distress असे म्हणता येईल.उदा. परिणाम – चिंता, उदासपणा, राग, आत्मविश्वासाचा अभाव, मनात नसलेल्या तडजोडी करणे, हांजी हांजी करणे, कोणतेही आव्हान टाळणे.  
इतरांबद्द्ल – इतरांनी माझ्याशी नेहेमीच न्याय्य व सहृदयतेने वागलेच पाहिजे; अन्यथा ते लोक दुष्ट व नालायक आहेत व त्यांना कठोर शासन झालेच पाहिजे. परिणाम – संताप, द्वेष, सूड, कलह, हत्या, युद्ध, वंशविच्छेद.  जगाबद्द्ल – माझ्या आजूबाजूची परिस्थिती मला नेहेमी अनुकूल व कमी कष्टप्रद असलीच पाहिजे; नाहीतर हे आयुष्य अगदी महाभयंकर आहे। मला अशा खडतर परिस्थितीत कदापि सुखी होता येणार नाही.  परिणाम – चटकन वैफल्यग्रस्त होणे, औदासिन्य, कामांत दिरंगाई करणे, व्यसनाचे गुलाम होणे.  वर उल्लेखलेल्या  घातक भावना नको तितका काळ व नको तितक्या वेळा टिकून राहणे व त्याचा मनुष्याच्या जीवनावर, उद्दिष्टांवर, आनंदावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच DISTRESS. एखादे काम करताना स्वत:चे ताण-तणाव नियमन न केल्यास' बर्न आउट सिंड्रोम' हा अशाच प्रकारे निर्माण होतो! पण परत लक्षात ठेवा, कोणालाही ‘बर्न आउट’ होऊ शकतो व  त्यालाही उपाय आहेत.
वरील तीन अविवेकी / विघातक  दृष्टिकोन माणसांमध्ये अनुवांशिक गुणांसारखे जन्मजात नसतात. हे दृष्टिकोन आपण लहानपणापासून आपले कुटुंब, शिक्षक, समाज यांच्यापासून उचललेले असतात. तसेच त्यावर विचार न करता ते स्वीकारलेले व  दृढही  केलेले असतात! पण एक चांगली गोष्ट अशी की ते आपणच निर्माण केले असल्याने ते आपण बदलू पण शकतो!

कसे बदलता येतात हे दृष्टिकोन ?
विवेकनिष्ठ मानसोपचारतज्ञ आपल्याला  आपले घातक दृष्टीकोन बदलण्यासाठी अशा  दृष्टिकोनांची सत्यासत्यता तपासण्यास मदत करतो. सोप्या भाषेत या दृष्टिकोनांना प्रतिप्रश्न विचारण्यास उत्तेजन देतो.  उदा.- प्रत्येक गोष्टीत १००% यशस्वी होणे इष्ट आहे की अत्यावश्यक आहे? मनुष्याच्या कोणत्याही अवगुणांवरून त्याला संपूर्ण बाद ठरवणे कितपत योग्य आहे ? आजूबाजूची परिस्थिती खडतर आहे की भयंकर आहे? आपल्या अविवेकी दृष्टिकोनांमुळे आपण आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांचा अर्थ  लावणे व मूल्यमापन किती घातक पद्धतीनी करत आहोत याची जाणीव तर  करून देतोच, पण ते बदलण्यासाठी अनेक वैचारिक, भावनिक व वर्तणूक तंत्रे पण शिकवतो. नवीन उपयुक्त व विवेकी दृष्टिकोन पक्के रुजवण्यासाठी सराव करण्यास प्रोत्साहन देतो, मार्गदर्शन करतो.
यामुळे बिकट परिस्थितीमध्ये माणूस हडबडून न जाता ती परिस्थिती अधिक निरोगी पद्धतीने  हाताळू शकतो. 
उदा.- मला अपेक्षित यश नाही मिळाले तर मी खट्टू जरूर होईन, पण निराशेच्या खाईत जाऊन स्वतःला नालायक वा कुचकामी ठरवणार नाही. जवळची व्यक्ती नीट वागली नाही तर मला वाईट जरूर वाटेल, मी चिडेनसुद्धा, पण संतापाच्या भरात  त्या व्यक्तीला एकदम खलनायक ठरवून काळ्या यादीत टाकणार नाही. माझ्या आजूबाजूची परिस्थिती अनुकूल नसली तर मला वैताग जरूर येईल, पण मी विफल होऊन  सर्व आयुष्याला एकदम कंडम ठरवून टाकणार नाही.
ताण-तणाव नियोजन किंवा स्ट्रेस –मॅनेजमेंट म्हणजे ताण संपूर्ण घालवणे नव्हे तर घातक ताणाचे समायोजन करणे हे आहे. कारण काही वेळा माणसाला घातक व अविवेकी  पद्धतीने विचार करून घातक ताण- DIESTRESS येणे स्वाभाविक आहे. पण विवेकनिष्ठ मानासोपचारासारख्या पद्धतीचा सराव करून आपण या घातक ताणाची ( चिंता, नैराश्य, क्रोध, वैफल्यग्रस्तता, द्वेष, मत्सर) तीव्रता व वारंवारता (DURATION & FREQUENCY) निश्चित कमी करू शकतो. आपली प्रगती करू शकतो.
याशिवाय - 
स्वतःसकट कोणाकडूनही १००% परफेक्ट असण्याचा अट्टाहास न करणे,
जीवनात अनिश्चितता आहे हे सत्य मान्य करून जीवनाचा आनंद उपभोगणे, 
आपल्या भावनिक स्वास्थ्याची किल्ली आपल्याच हातात आहे हे जाणून घेणे,
काळी यादी माणसांची नाही दुर्गुणांची ठेवणे,
कधीतरी आयुष्यातल्या दूरवरच्या उद्दिष्टांसाठी नजीकच्या सुखावर पाणी सोडणे,
त्रासदायक जरूर असले तरी भयंकर नाही.
Pain is inevitable; sufferings are optional!  
If you cannot change the situation; accept it gracefully! 
असे अनेक विवेकी दृष्टिकोन मनात ठसवण्यासाठी काही स्व-मदत पुस्तके, व्हिडिओ, आत्मचरित्रे अशा गोष्टीसुद्धा उपयोगी ठरतात.

बर्न आउट टाळण्यासाठी विवेकनिष्ठ मानसोपाचाराव्यातिरिक्त आणखी काही उपयुक्त गोष्टी-
  1. आठवड्यातून किमान पाच दिवस किमान २०-३० मिनिटे व्यायाम. उत्तम Antidepresant !
  2. दिवसातून किमान पाच-सहा वेळा थोडे-थोडे खाणे (small, frequnt feed).
  3. दिवसातून किमान आठ ग्लास पाणी पिणे.
  4. अमली पदार्थांपासून दूर राहणे.
  5. दिवस, आठवडा, महिना, वर्षे अशा टप्प्यांमध्ये वेळेचे नियोजन करणे. 
  6. mindfulness, ध्यानधारणा, relaxation तंत्रे शिकून घेणे.
  7. कौटुंबिक व सामाजिक हितसंबंध निकोप ठेवणे. 
  8. आपले संवादकौशल्य, आंतर-वैयक्तिक संबंध सुधारणे.
  9. आपल्या विचार व भावनांची डायरी ठेवणे.
  10. योग्य तेथे ‘नाही’ म्हणावयास शिकणे.
  11. स्वतःच्या आवडीच्या छंदांसठी आवर्जून वेळ काढणे.
  12. सर्जनशील सामाजिक उपक्रमांना जोडून घेणे.
  13. आपल्या ताणतणावाबाबत विश्वासाच्या ठिकाणी मोकळेपणाने बोलणे.
  14. आपण सुपरमॅन किंवा सुपरवूमन नाही यांची जाणीव ठेवणे.
  15. घातक ताण ओळखून त्यावर लगेच उपाय योजणे.
  16. शक्य तेथे व्यावसायिक मदत (मानसोपचारतज्ज्ञ, मनोविकारतज्ज्ञ) घेण्यास कमीपणा न मानणे.
  17. स्वतःच्या छोट्या छोट्या प्रगतीचे कौतुक करणे.
  18. जगात अनेक लोकांनी आपले  अपयश, अपमान, खडतर परिस्थिती तसेच न्यूनतेवर मात केलेली असते. त्यांची चरित्रे, आत्मचरित्रे मार्गदर्शक ठरू शकतात.  

ही यादी तुम्ही तुमच्या कल्पकतेने आणखीही समृद्ध करू शकता. पण नेहेमी लक्षात ठेवा, नुसते  बरे वाटण्यावर (feel good) समाधानी होऊ नका; बरे होणे (get better) व बरे राहणे (stay better) याकडे वाटचाल ठेवा. त्यासाठी आपल्या भावनिक दुःखाचे मूळ कोणत्या दृष्टिकोनात दडून बसले आहे त्याचा शोध घेऊन त्याला हद्दपार करा. विवेकनिष्ठ मानसोपचाराचा उद्देशच मुळी भावनिक अस्वस्थता निव्वळ दूर करणे एवढाच मर्यादित नसून, आपण स्वतंत्रपणे आपले भावनिक प्रश्न सोडवण्यास सक्षम होणे हा आहे!  शेवटी एक सुंदर प्रार्थना जरूर समजून घ्या –
जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहावया
जे शक्य साध्य आहे, निर्धार ते कराया
मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय
माझे मला कळाया, दे बुद्धी देवराया!


डॉ वैशाली चव्हाण, MBBS; Dip Anaesth
भूलतज्ञ,
           अल्बर्ट एलीस इन्स्टिट्यूट (न्यूयॉर्क), सर्टिफाईड REBT प्रॅक्टिशनर



1 comment: