शार्ल बोदलॅर - ठसा उमटवणारा फ्रेंच कवी

 

Charles Baudelaire


कुठल्याही भाषेतील साहित्य हे ज्या त्या समाजाचा आरसा असतो असे म्हटले जाते. त्या समाजाची तत्कालीन मानसिकता, ऐहिकता तयार होण्यामध्ये तो समाज जिथे असतो तिथल्या बाह्य अवस्थांचा पण खूप मोठा सहभाग असतो. आणि साहजिकच या सगळ्याचा परिणाम त्या कालखंडातील साहित्य निर्मितीवर होत असतो.

शार्ल बोदलॅर या फ्रेंच कवीच्या कविता सुद्धा ह्याला अपवाद नाहीत. शार्ल बोदलॅर (१८२१-१८६७) हा कवी आणि त्याच्या कविता फ्रेंच साहित्यात ठळकपणे उठून दिसतात. १९व्या शतकात फ्रान्समध्ये खूप उलथापालथ झालेली दिसते. याच पॅरिस शहरात शार्ल बोदलॅरचा जन्म १८२१ साली झाला आणि याच शहरात तो लहानाचा मोठा झाला.

याच १९व्या शतकात सम्राट नेपोलियन म्हणजेच पहिला नेपोलियन याचे पतन होते. त्यानंतर जगप्रसिद्ध फ्रेंच राज्यक्रांतीने उलथवलेल्या राजेशाहीची पुनर्स्थापना होते. मग दुसरी राज्यक्रांती, या दुसऱ्या राज्यक्रांतीनंतर पुन्हा राजेशाही, ती उलथवून टाकून प्रजासत्ताकाची स्थापना, आणि पुन्हा प्रजासत्ताक उलथवून टाकून तिसऱ्या नेपोलियनचे राज्यावर बसणे, आणि स्वतःला सम्राट म्हणून घोषित करणे अशा सततच्या अशांत राजकीय स्थितीत फ्रान्स होरपळत होता. याच परिस्थितीत फ्रान्स आणि जर्मनी या देशांत युद्ध झाले आणि फ्रान्स या युद्धांत हरला. मग पुन्हा प्रजासत्ताकाची स्थापना अशा अस्थिर राजकीय स्थितीला फ्रेंच जनता तोंड देत होती.

याच काळात फ्रान्स मध्ये औद्योगिक क्रांती ही झाली. विद्यानाच्या विविध शाखांमध्ये होत असणारी प्रगती, लागणारे नावे शोध यांचा ही लोकांच्या जीवनावर परिणाम होत होता. दळणवळण, वाहतुकीच्या सोयी वाढत होत्या. औद्योगीकरण झपाट्यानी वाढत होते. त्यामुळे होणाऱ्या कामगार चळवळी, शहराकडे येणारा लोकांचा लोंढा, त्यामुळे शहरात वाढलेली गर्दी, बकालपणा, अशा अनेक स्थित्यंतरातून फ्रान्स जात होता .

या सगळ्याचा परिणाम मानवी मनावर , त्याच्या विचारांवर आणि ओघानेच त्याच्या साहित्यनिर्मितीवर झालेला दिसतो. अशा वातावरणात फ्रान्सची एक पिढी जन्माला आली आणि वाढली. या पिढीचा प्रतिनिधी शार्ल बोदलॅर.

शार्लचे वडील त्याच्या लहानपणीच हे जग सोडून जातात. त्याची विधवा आई दुसरे लग्न करते. शार्ल च्या आयुष्यात एक खूप मोठी पोकळी निर्माण होते. आपल्या आईच्या आता बदललेल्या प्राथमिकता, तिचे त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष, आईची त्याच्यावरच्या प्रेमात झालेली घट त्यामुळे छोटा शार्ल दुखावला जातो. आपल्या सावत्र वडिलांचा स्वीकार करणे त्याला जमले नाही. जरा मोठा झाल्यावर तो पॅरिस मध्येच वेगळा राहायला लागतो. त्याला वाईट सांगत लागते. उदरनिर्वाहासाठी त्याच्याकडे भरभक्कम असे काही नसते. त्याची आर्थिक, भावनिक, मानसिक स्थितीही फारशी चांगली नसते. यामुळे मद्यपानाचे व्यसन लागलेले असते. नेहमी कर्जाच्या विळख्यात असलेल्या ह्या दुर्दैवी कवीचे हलाखीच्या स्थितीत ३१ ऑगस्ट १८६७ या दिवशी निधन होते.

पोट भरण्यासाठी कमाई हवी या गरजेपोटी तो लिहायला लागला. त्याच्या कविता खूप नाहीत. त्याच्या कवितांमधून विषण्णता, नकारात्मकता, विद्रूप वास्तवता दिसते. या कविता भावनावेगातही लिहिलेल्या जाणवतात. तो सतत लिहित असे असेही नाही. त्याच्या कवितांमधून वास्तववाद जरी डोकावत असला तरी ह्या कवितांची रचना सुसूत्र आणि काटेकोरपणे केलेली दिसते. आपल्या कविता व्यवस्थित यमकात बसवण्याची आणि तालबद्ध रचना करण्याची काळजी तो हमखास घेताना दिसतो.


त्याच्या जवळजवळ सर्व कविता त्याच्या '
Les Fleurs Du Mal' म्हणजेच 'वाईटाची फुले' या काव्य संग्रहात एकत्रित केल्या आहेत. या कवितांमधून कुरुप, घृणास्पद, किळसवाणं, दुर्गुणी अशी वास्तवता समोर येते. त्याचबरोबर अफाट गर्दी, भयाण उजाड रस्ते, यासारखी प्रतीकेही दिसतात.

या 'वाईटातून" स्वतःची सुटका करून घेण्यासाठी तो आपल्या 'प्रवासासाठी आमंत्रण' या कवितेत आपल्या प्रेयसीला म्हणतो, (इथे कवी आपल्या प्रेयसीला बहिण म्हणतो, प्रेयसीत त्याला बहिणीची माया, प्रेम आणि जवळीक हे ही दिसतात),

माझ्या लेकरा ,माझ्या बहिणी ग,

जरा विचार कर त्या हळूवारपणाचा,

त्या तिथे जाऊन एकत्र राहण्याचा,

 

शांतपणे मनासारखं प्रेम करायचं,

प्रेम करायचं आणि जीवन संपवायचं,

तुझ्याप्रमाणे असलेल्या त्या देशांत!


प्रसाद बर्वे




1 comment:

  1. Barve Sir, Nice article. Congratulations !! Looking fwd to read more translations from you. All the Best.

    ReplyDelete