'गोड बोलण्याचा' संदेश


गोड बोलणे हा जिभेचा गुण आहे. नुसती जिभेवर साखर पेरून गोड बोलता येत नाही, तर गोड बोलण्यासाठी अंतःकरणातून, मनातून गोडवा असावा लागतो. मनात असे ते मुखी निघे. तेव्हा गोड बोलणे जमले पाहिजे. खरे तर गोड बोलणे पण एक कला आहे. तो त्या व्यक्तीचा गुण आहे.  समोरच्या व्यक्तीचे विचार वा मते पटत नसतील तर लगेच कठोर शब्दात त्याचे विचार खोडून आपले विचार मांडणे; ज्याला आपण स्पष्टपणा म्हणू या- पण हेच मधुर वाणीने, समोरच्यास  पटेल असे शुगर कोटेड बोलता येते व गळी उतरविता येते, समजविता येते.

आणि तसे पाहिले तर मधुर वाणी वा गोड बोलण्यात कुठे आपले पदरचे काढावे लागतात? आणि मधुमेह असला तरी गोड खाण्यास बंदी असते, गोड बोलण्यात नाही. तेव्हा कोणाचेही त्याच्या  स्तुत्य कामासाठी तोंड भरून, गोड शब्द बोलून कौतुक केल्यास आवडते. त्यास आनंदित करते. तेव्हा जर आपण गोड बोलण्याने दुस-यास आनंद मिळत असेल (आणि का नाही मिळणार आनंद? ) तर हो,  हे गोड बोलणे जमलेच पाहिजे. आपण पण गोड बोलले पाहिजे. कारण म्हणतात ना 'वचनेषु किंम् दरिद्रता'?  गोड वाणीने जग जिंकता येते. जग नाही तर लोकांना जिंकून आपलेसे करता येते. 

गोड बोलण्याच्या त-हा आहेत.  मनातून नसले, तरी समोरच्यास खुश करणे. जसे कोल्ह्याने कावळ्याशी गोड बोलून आपले खाद्य मिळविले व काम साध्य केले, असे गोड-बोले  पण असतात. अशा लोकांना वर वर गोड बोलण्याची कला अवगत असते. ते आपल्या कलेचा गोड बोलण्यात उपयोग करून घेत असतात. 

आपल्या संस्कृतीत मकर संक्रातीला 'गोड बोला'चा संदेश देतोच ना. पण एकमेकांतील मैत्री वाढावी व आपुलकीचे नाते दृढ रहावे हा त्या मागचा उद्देश असतो.

सध्याच्या मोबाइल युगात आपण सकाळ ते रात्रीपर्यंत शुभ सकाळ,  have a good day, take care, enjoy the day असे संदेश पाठवून गोड बोलत असतोच पण ते औपचारिक झाले आहे. पापणी लवण्या इतके अंगवळणी पडले आहे .

चला तर, या महिन्यातच मकरसंक्रात आली आहे, 'गोड बोलण्याचा' मी पण संदेश देते.

--वैशाली  वर्तक 



2 comments: