LIPSTICK UNDER MY BURKHA


दिग्दर्शक - अलंकृता श्रीवास्तव.   निर्माता- प्रकाश झा.
'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा सिनेमा पाहायला जाताना मनात एक उत्सुकता होती. स्त्रीप्रधान सिनेमा. एका स्त्रीने लिहिलेला. दिग्दर्शित केलेला. पटकथाही तिचीच. कलाकारांमध्ये रत्ना पाठक-शहा, कोंकणा सेनशर्मा . मनातील अपेक्षा उंचावणाऱ्या गोष्टी.
सिनेमाची कथा भोपाळमधील. म्हणजे अगदी महानगर नसले तरीही छोटे गावही नाही. येथे राहणाऱ्या, या चार वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रिया. त्या राहतात त्या इमारतीचे नाव 'हवाई मंझिल'. ही इमारत १०२ वर्षे जुनी आहे असा उल्लेख सिनेमात येतो. ही इमारत पाडून तिथे नवी इमारत उभारण्यासाठी काही बांधकाम व्यावसायिक प्रयत्नात आहेत.
सिनेमाची गोष्ट कदाचित सगळ्यांना आतापर्यंत माहिती झाली असेल. पण या गोष्टी सांगण्याचे कारण म्हणजे, मला त्या प्रतिकात्मक वाटतात. भोपाळ, नव्या जगाशी संपर्क असलेले, पण पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या रूढीवादी विचारांचाही पगडा असलेले शहर. इमारतीचे नाव 'हवाई मंझिल'. हवेत इमले उभारणाऱ्या ह्या चारही स्त्रिया किंवा मुक्त आकाशात विहरण्याची इच्छा असलेल्या ह्या चारही स्त्रिया. इमारत अतिशय जुनीपुराणी. पण ती पाडण्यासाठी सगळ्यांचाच विरोध. उषा बुआजींचाही.

उषा बुआजी ह्या विधवा. पण नातवांना स्विमिंग शिकवताना त्यांना स्वतःलाही स्विमिंग शिकावेसे वाटते. तेथील शिक्षकाचेही आकर्षण त्यांना वाटते. त्या स्वतःच्या कल्पनाविश्वात रमतात. ‘रोझीही त्या वाचत असलेल्या पुस्तकातील प्रेमकथेतील नायिका. त्यांचा आव सत्संग करण्याचा असतो. घरच्यांना खोटे सांगून त्या स्विमिंग शिकायला जातात. भीत भीत का होईना, चौकटीच्या बाहेर जाण्याचा त्या प्रयत्न करतात.

शिरीन अस्लम ही चोरून नोकरी करत असते. नवरा तिच्यात कोणतेही भावनिक संबंध नाहीत. फक्त शारीरिक संबंध. तेही नवऱ्याच्या गरजेपुरते. मनात दुखरा साल घेऊन वावरणारी ही तरुणी.
लीला ही ब्युटी पार्लर मध्ये काम करते. स्कूटर चालवते. स्वतःची वाट स्वतः शोधण्याची तिची इच्छा. तिच्या आईच्या मनाप्रमाणे तिचा साखरपुडा होतो आहे. पण ह्या नात्यात तिची भावनिक गुंतवणूक नाही. तिच्या प्रियकरासोबतचे तिचे संबंध चालूच आहेत. पूर्णपणे शारीर चौकटीत अडकलेली ही मुलगी. होणारा नवरा प्रियकर या दोघांकडून बिनधास्तपणे शरीर संबंधाची मागणी ती करते. यात तिला काही गैर वाटत नाही. स्वतःची टुरिझम कंपनी असावी असे तिचे स्वप्न आहे.
रेहाना ही कॉलेजमध्ये जाणारी मुलगी. बुरखा घालून घराबाहेर पडते, पण कॉलेजात जाताच बुरखा काढून टाकते. ती पार्टीला जाते, दारू पिते, सिगरेट ओढते. ज्या ज्या गोष्टी बंड म्हणून कराव्याशा वाटतात, त्या ती करते. तिला गायिका व्हायचंय. मायली सायरस ही तिची आवडती गायिका.

या चारही स्त्रियांचे हे खासगी आयुष्य आपल्यासमोर दिग्दर्शिका आणते. आणखी एक व्यक्तिरेखा या चित्रपटात आहे. तिचा फारसा उल्लेख कोणी केलेला नाही. ती म्हणजे लीलाची आई. ती न्यूड मॉडेलींग करते. लीलाला हे माहिती आहे. आपल्या मुलीचे सालस मुलाशी लग्न व्हावे ही तिची इच्छा आहे. त्याचप्रमाणे होणारा जावई मनोज, हा तिला घर घेऊन देणार आहे. ही तिच्या मते मोठ्ठी जमेची बाजू आहेमुलीबरोबर स्वतःलाही घर मिळावे ही तिची आस आहे.

या सर्व स्त्रिया दबलेल्या असून, परिस्थितीने गांजलेल्या असून, एक वेगळी दिशा चोखाळण्याचा प्रयत्न करत आहेत. रेहानाला गायिका व्हायचंय. लीलाला बिझिनेस करायचा आहे. शिरीनला बढती मिळून सेल्स ट्रेनरची नोकरी करायची आहे. उषा बुआजीना अशी काही आकांक्षा नाही.
सिनेमाच्या शेवटी उषा बुआजींच्या भाच्यांना त्यांच्या स्विमिंग बद्दल आणि त्या चोरून स्विमिंग टीचरला करत असलेल्या फोनबद्दल कळते. शिरीनला तिचा नवरा नोकरी सोडायला सांगतो. लीलाच्या अफेअर बद्दल मनोजला कळते. रेहानालाही चोरी केल्याच्या आरोपावरून पोलीस पकडतात. तिचे स्वातंत्र्य आता धोक्यात येते.

या चौघी जणी इमारतीच्या तळमजल्यावर, जिथे बुरखे शिवण्याचे रेहानाच्या वडिलांचे दुकान आहे, तिथे जमतात. ही दिवाळीची रात्र आहे. लक्ष्मीपूजनाची आणि अमावास्येचीही!! सगळीकडे दिव्यांची रोषणाई आहे. पण या चौघी स्वतःच्या आणि एकमेकींच्या दुःखात सहभागी झाल्या आहेत. बुआजींच्या रोमँटिक पुस्तकाची शेवटची पाने त्या वाचत आहेत. सिनेमा इथेच संपतो. आपण बाहेर पडताना विचारमग्न असतो. थोड्याशा निराशही!!

कारण दिग्दर्शिकेने कोणतेच उत्तर दिलेले नाही. एक परिस्थिती समोर ठेवली आहे. उत्तरे प्रत्येकीने आपापली शोधायची आहेत. पण निराश अशासाठी वाटले की, काही प्रश्नांची सोप्पी उत्तरे समोर असूनही या बायका ती का देत नाहीत? शिरीन, जी नवऱ्यापासून लपून सेल्स एजंट बनते, काम करते, ती आपले ऑपरेशन करून नाही घेऊ शकत? लीलाला व्यवसाय करायचा आहे, तर ती त्या संदर्भात काहीतरी शिक्षण घेण्याचा प्रयत्नही का नाही करत? रेहानाचा कोणत्याही प्रकारे स्वतःच्या आई-वडिलांशी संवाद नाही. तिने शिक्षण घ्यावे अशी इच्छा असणारे तिचे आई-वडील आहेत, मग ती त्यांच्याशी संवाद का साधू शकत नाही?

या सिनेमावर विचार करताना 'मिर्च मसाला' सिनेमा आठवला. भोगवस्तू व्हायला ठाम नकार देणारी नायिका. नवऱ्याला विरोध करणारी मुखियाची पत्नी!!! दीप्ती नवलने अप्रतिम काम केले आहे या चित्रपटात. तिचा संताप, तिचा आक्रोश आणि तिची तडफड आपल्यापर्यंत पोचते. आणि शेवटी मस्तवाल सरकारी अधिकाऱ्याच्या डोळ्यांत मिरची पावडर घालणाऱ्या अशिक्षित स्त्रिया!!! वेळ येताच अत्याचाराविरुद्ध त्यांनी उचललेले हे पाऊल.

नुकताच आलेला 'Angry Indian Godesses' हा सिनेमा ज्यांनी कोणी पाहिला असेल, त्यांना या सिनेमाचा शेवट नक्कीच आठवत असेल. यात केवळ काही स्त्रियांनीच नव्हे, तर साऱ्या समाजाने घेतलेली अत्याचारविरोधी भूमिका मनाला दिलासा देऊन जाते.

मला जवळ जवळ ८०/९० वर्षांपूर्वी आलेला 'कुंकू' सिनेमा आठवला. फसवून म्हाताऱ्या माणसाशी लग्न झाले, म्हणून हे लग्न नाकारणारी नायिका!!

'डोर' सिनेमातील मीरा. सुरवातीला निमूटपणे प्राक्तन म्हणून विधवेचे जीवन स्वीकारणारी. पण झीनतच्या मैत्रीमुळे आणि आजेसासूच्या प्रोत्साहनामुळे स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे धैर्य दाखवणारी मीरा! आयुष्य नव्याने सुरू करण्याची उमेद असणारी मीरा.

LIPSTICK UNDER MY BURKHA - एक सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणते. वर उल्लेखिलेल्या कोणत्याही सिनेमात दाखवलेली एक लैंगिक बाजू या चित्रपटात ठळकपणे समोर येते. बुआजींची दबलेली वासना!! नवऱ्याच्या भावनाशून्य संभोगाला विटलेली शिरीन! लीलाची प्रखर लैंगिकता!! पण या चक्रातच हा सिनेमा गुंतून रहातो असे वाटते. हा दिग्दर्शिकेचा निर्णय असूच शकतो. तिला हेच सांगायचे आहे, असेही असू शकते. पण मग पुढे काय?- हा विचार मनात आल्याशिवाय रहात नाहीया स्त्रिया ही चौकट तोडतील असेही वाटत नाही. आणि मग ही लिपस्टिक बुरख्याआडच दडली राहील या विचाराने अस्वस्थ वाटते.


                                                      स्नेहा केतकर

3 comments:

  1. Very nice movie review Sneha, haven't watched the movie... You've a wonderful penmanship. Keep it up, will be waiting for more movie reviews..

    ReplyDelete
  2. Good and balanced review

    ReplyDelete