खरं तर विषय अजिबातच
माहीत नव्हता. एखादा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी आजकाल ज्या पद्धतीने आणि ज्या
स्तरावर प्रमोशन केलं जातं, तसं या चित्रपटात बाबतीत काहीच दिसलं नाही. (किमान
मला तरी). पण स्पेस सायन्स, इस्रो
अशी नावं आणि असे विषय जोडले गेले असल्याने हा चित्रपट आवर्जून पाहावसा वाटला.
म्हणजे अगदी हा चित्रपट पाहताना मी अगदी कोरी पाटी घेऊन गेले होते असं म्हटलं तरी
वावगं ठरणार नाही.
थिएटर मध्ये जाऊन बसले, सुरुवातीच्या
सगळ्या त्या जाहिराती, इतर चित्रपटांचे ट्रेलर संपले आणि
"कौसल्या सुप्रभा रामपूर्वा संध्या प्रवर्तते" याने जी चित्रपटाची
सुरुवात झाली तेंव्हाच काही तरी विलक्षण अनुभूती वाटून गेली. आणि मग पडद्यावर,
लेखक, दिग्दर्शक आणि मग अभिनेता (अभिनेता
म्हणून तो काम करतो आहे इतकंच माहिती होतं) म्हणूनही आर. माधवन हे नाव झळकले.
खरं तर त्याला लेखक आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत पाहणं हा surprise element होता.
ही गोष्ट एका
झपाटलेल्या शास्त्रज्ञाची. झपाटलेपण आपल्या कामाच्या बाबतीत, झपाटलेपण
देशासाठी काहीतरी करून दाखवण्याबाबतीत, झपाटले पण भारताला
रॉकेट सायन्स, सॅटेलाईट्स, स्पेस
सायन्स या सगळ्या बाबतीत एक वेगळा आयाम देऊन जगात
भारताचे पाय मजबूत करण्यासाठी.
ही गोष्ट ज्येष्ठ
शास्त्रज्ञ नांबी नारायणन यांची. विक्रम साराभाई
यांचे पुत्रवत शिष्य, तर डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे मित्र. अंतराळ
विज्ञानात भारताची वेगाने प्रगती व्हावी यासाठी झटणारा एक वेडा माणूस. त्याकाळी
म्हणजे ६० च्या दशकात, जिथे भारत अजून स्पेस सायन्स मध्ये
आपले पाय रुजवण्यासाठी धडपडत होता, तेंव्हा या माणसाने
अमेरिकेत जाऊन, पुढील तंत्रज्ञान शिकून त्याचा आपल्या देशाला
कसा उपयोग होईल या प्रयत्नात होता. अमेरिकेत इतके उत्तम शिक्षण झाल्यानंतर केवळ
राष्ट्रप्रेम म्हणून हजारो, लाखोंची नासाची नोकरी
धुडकावून मायदेशी परत येणारा वेडा माणूस. इतकंच नाही तर आपले प्रयोग यशस्वी होण्यासाठी बाहेरून काही पार्टस मागविण्याची गरज
असताना, या
व्यक्तीने ज्या पद्धतीने बाहेरील देशांशी ज्या कमालीच्या डील्स केल्या त्यातून या
माणसाची मुत्सद्देगिरी दिसून येते.
आजवर फोर्सेस, इंटेलिजन्स
एजेन्सी यांचे आपण अनेक "मिशन्स" ऐकले, पाहिले. पण
शास्त्रज्ञांनी केलेलं (माझ्या माहितीत तरी) हे पहिलं "मिशन" होतं.
५२ शास्त्रज्ञांची आणि त्यांचं कुटुंब अशी फौज घेऊन फ्रान्सला जाणं, तिथून
हवी असलेली सगळी माहिती गोळा करणं, आणि कमालीची गुप्तता
ठेवून आपल्या मायदेशी परत येणं. किंवा अमेरिकेच्या हल्ल्यातून जीव मुठीत घेऊन
रशियाचे काही equipments भारतात घेऊन येणं असो.
देशाच्या प्रगतीचा
ध्यास घेऊन जगणारा हा माणूस, तेंव्हा इस्रोचा डायरेक्टर म्हणून होण्याच्या
उंबरठयावर उभा असताना अचानक एकाएकी "राष्ट्रद्रोह" हा आरोप लावून
त्यांना अटक केली जाते. त्यांचा, त्यांच्या
कुटुंबीयांचा झालेला अतोनात छळ, निंदा-नालस्ती, तुच्छ
वागणूक पाहून आपलं मन सुध्दा कालवतं. त्या काळातील
तत्कालीन वेगवेगळे investing departments, केरळ पोलीस खाते आणि काही
भ्रष्ट पोलीस अधिकाऱ्याचा सासेमिरा पाहून चीड आणि कीव आल्याशिवाय राहत नाही.
स्वतः ला निर्दोष
सिद्ध करण्यासाठीची धडपड, सुप्रीम कोर्टापर्यंतचा केसचा प्रवास, ७५ कोर्टाच्या तारखा, या सगळ्यात गमावलेली
मानसिक शांतता आणि बरंच काही. यात पुन्हा इस्रोमध्ये जाऊन परत
देशाच्या भवितव्याचा विचार करून कामाला लागणं असो किंवा सरतेशेवटी निर्दोष मुक्तता, आणि compensation म्हणून मंजूर झालेले पण न मिळालेले १ करोड रुपये ही सगळी व्यथा या
चित्रपटात एका मुलाखतीच्या रूपात उलगडली जाते.
पाहुणा कलाकार म्हणून
आलेला शाहरुख खान मुलाखत घेणारा, तर नांबी यांचं पात्र
साकारणारा आर. माधवन यांच्यापासून सुरुवात होते.
पण शेवटी, जेंव्हा
खरे नांबी नारायणन दाखवले जातात आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी, चेहऱ्यावरचे भाव आणि त्यांच्यावरील आप बीती पाहतो, ऐकतो
तेंव्हा मात्र अंगावर काटा येतो.
आर. माधवनने हा विषय
हाताळून खरं तर खूप मोठं शिवधनुष्य पेललं. अभिनेता म्हणून तर उत्तम काम केलंच पण
लेखक आणि दिग्दर्शक म्हणून, चित्रपटाच्या शेवटी खऱ्या नांबी सरांना
सगळ्यांसमोर आणून चित्रपट एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवला.
ज्याला आपले विज्ञान, आपला इतिहास जाणून घ्यायचा असेल त्याने हा चित्रपट नक्की पाहावा. इतकंच नाही तर आपल्याकडे कमालीचं ज्ञान असणारे, देशासाठी झटणारे किती लोक होते, आहेत आणि आपल्याला त्याची कल्पनाही नसते. तर अशा एका तरी माणसाची यातून ओळख होईल म्हणून तरी आणि एक उत्तम कलाकृती म्हणूनही हा चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पाहावा.
ऍड. मधुरा ओगले - देव
Rocketry पहायची उत्सुकता वाढली.
ReplyDelete