शब्देविण संवादु



कॉलेज मध्ये विद्यार्थ्यांना communication system संबंधित एक नवीन टॉपिक शिकवायचा होता. शिकवताना आपल्यालाही तरुण झाल्यासारखे वाटते. तरीही वस्तुस्थिती, आपण तितके तरुण नाही हीच असते. त्यामुळे आपल्या तरुणपणाच्या २०-२५ वर्षांपूर्वील गोष्टी आपल्याला कितीही कालच्याच वाटल्या, तरीही ते सर्वांसाठी लागू होईलच असे नाही. पण मुलांशी बोलताना माझे मन मात्र हलकेच २५ वर्षांपूर्वीच्या भूतकाळात गेले.

२५-३० वर्षांपूर्वी शाळेव्यतिरिक्त आपल्या मित्रांना संपर्क करण्याचे एकमेव साधन म्हणजे सायकल नावाचे वाहन उचलणे आणि टांग मारून आपल्या मित्राच्या घरी जाऊन धडकणे. त्याच्याशी तासनतास गप्पा मारणे. घरी निघतो असे सांगून त्याच्यासोबत पुन्हा फाटकापाशी गप्पांचा दुसरा राउंड. ते करत असताना काही क्षण असे यायचे की काही मिनिटे आपण दोघेही शांत. पण आपल्या मनात काहीतरी विचार सुरु असणार. त्या शांततेत काही वेळ गेला की अचानक त्याला एक अनपेक्षित प्रश्न विचारावा आणि त्याचे उत्तरही अनपेक्षितपणे तयार. इतक्या पटकन विचार न करता कसे सांगितले रे, असे विचारले की तो म्हणणार, "अरे, मी पण अगदी तोच विचार करत होतो". ह्याला telepathy म्हणावे की काय म्हणावे? पण, "शब्देविण संवादुचा आलेला हा आठवणीतील पहिला अनुभव व पहिली ओळख.

मैत्रीतील संभाषणातील सर्व वाद नाहीसे झाले आहेत, तेव्हाच असा संवाद हा शक्य आहे. मुळातच "संवाद"चा अर्थच समन्वय अधून झालेले बोलणे, जिथे "विसंवाद" नाही, म्हणूनच तोसंवाद”. पण तसंही 'वाद' म्हटले की का कुणास ठाऊक नवरा-बायकोचेच नाते आठवते. एकदा नव्याची नवलाई ओसरली, राजा-राणीचा लुटुपुटीचा आनंदी-आनंद आटोपला आणि थोड्या प्रापंचिक जबाबदाऱ्या सुरु झाल्या की मग खेळात खरी मजा सुरु होते. सर्वप्रथम सर्वांचे मुखवटे हळूच गळून पडतात आणि लपवलेली शब्दांची धारदार शस्त्रे बाहेर पडतात. लग्नाला ३-५ वर्षे झाली की वादाची सुरुवात होते तीच मुळात "तू असं करशील/बोलशील असं मला वाटलं नव्हतं" ह्या सलामीच्या चौकाराने. ह्यात जर कोणी निरुत्तर झाले की मग अबोला. तो अबोला काढण्यासाठी नंतर आपला इगो आणि पोझिशन न सोडता प्रयत्न करायचे. हा कालखंड फार जोखमीचा. जे संबंध तुटायचे ते ह्याच कालखंडात तुटतात. पण हा काळ जर भांडत-भांडत का होईना पण फार न ताणता आणि कधी सामोपचाराने माघार घेऊन पार पाडला तर मग तुम्ही खेळाच्या पुढच्या राउंडला पोहोचता. -१० वर्षांनी हे सर्व खूपच रुटीन होतं व ह्या जुन्या खेळाचा कंटाळा येतो. तोपर्यंत दुसऱ्या व्यक्तीची नक्की अपेक्षा काय असेल याचा अंदाज यायला लागतो आणि पती-पत्नीतील खऱ्या संवादाला सुरुवात होते. अजून काही काळ गेला की ह्या संवादाला शब्दांची खूप गरज पडत नाही. "शब्देविण संवादु" चा बऱ्याच लोकांना येत असलेला हा अजून एक अनुभव.

त्या २५ वर्षांपूर्वीच्या कालखंडातील संपर्काचा आणि मैत्रीचा असलेला अजून एक प्रकार म्हणजे पत्रमैत्री. आपलं ज्यांच्याशी चांगलं पटतं असे भाऊ-बहीण किंवा मित्र-मैत्रीण बाहेरगावी राहत असतील, तर त्याकाळी व्यक्तिगत संवादाचे एकमेव साधन म्हणजे 'पत्र ' नावाची एक गमतीदार गोष्ट. आजच्या SMS, FB आणि WA च्या जमान्यात पत्र  ही गोष्ट शेकडो वर्षे जुनी गोष्ट वाटते. सुरवातीला संपर्क ठेवण्याचे आणि हाल-हवाल कळवण्याचे साधन म्हणून वापरलेले 'पत्र ' संवादाचे साधन केव्हा होते, ते कळत देखील नाही. अत्यंत निरागस दिसणारे हे साधन मात्र अत्यंत सामर्थ्यशाली होते, ह्याचा अंदाज येणे कठीण आहे. पत्रमित्राला पत्र लिहायला बसल्यावर (आणि ते बसण्याची सवय झाल्यावर) पत्रात जे उमटतं तो केवळ मित्राशी केलेला संवाद नसून स्वतःशीच केलेला संवाद केव्हा होतो, हे कळतदेखील नाही. अश्या संवादात आपल्या मनाचा एक कोपरा आपणपांढऱ्यावर काळेकरून पूर्णपणे उघड करत असतो आणि आपल्या हस्ताक्षरांची व्यक्तिगत मोहोर त्यावर उमटवत असतो. स्वतःची एक व्यक्तिसापेक्ष ओळखच जणू (personalized identity) आपण त्या पत्राला बहाल करत असतो. अशी मैत्री कोणाशी झाली तर ती वेळेचे बंध ओलांडूनही टिकते. पत्र-लिखाण आणि पत्रमैत्री आता इतिहासजमा झाल्यामुळे स्वतःला व्यक्त करण्याचा एक अप्रतिम मार्ग आपण आज गमावला आहे. ह्याचे  दुःख ज्यांची कधी कोणाशी पत्रमैत्री झाली असे लोकच सांगू शकतील. पत्रमैत्री हा "शब्देविण संवादु" चा नसला तरीही "शब्दांच्या नादाविना झालेला संवाद" असल्यामुळे त्याचेच एक भावंडं समजायला हरकत नसावी.

तसं बघायला गेलं तर ज्ञानेश्वर माऊलींची पूर्ण ओळ आहे, - "शब्देविणा संवादु , दुजेविणा अनुवादु" - म्हणजे संवादात शब्द तर नाहीच आहेत, पण अनुवाद करायला (म्हणजे समजून घ्यायला) कोणी दुसरी व्यक्तीदेखील नाही. हे कसं शक्य आहे ? संवाद हा एकट्याचाच कसा काय होऊ शकतो? आणि झालाच तर त्याला स्वगत का म्हणू नये, संवाद का म्हणावा, असा प्रश्न बऱ्याच दिवसांपासून पडला होता. त्याचे काही दिवसांपूर्वी आपसूकच उत्तर मिळाले.

शाळेच्या WA ग्रुपवर काही दिवसांपूर्वी शाळामैत्रीण स्नेहश्रीने एक सुंदर लेख लिहून पाठवला. त्यात तिने तिच्या घरासमोरची आमराई तोडून येऊ घातलेल्या नवीन इमारतीमुळे मनात निर्माण झालेले पडसाद मोजक्या शब्दात लिहून व्यक्त केले होते. तिचा दररोज त्या आमराईशी, तिथल्या झाडांशी, पक्षांशी होणारा दररोजचा संवाद आता इमारतीच्या जंगलामध्ये विरून जाणार, ती झाडे नष्ट होणार, माणसांच्या घरांसाठी पक्षी त्यांच्या घरट्यांना पारखी होणार, हे त्या लेखातून व्यक्त झाले होते. हा संवाद नक्की कोणाचा कोणासोबत होता? तिचा झाडांसोबत आणि पक्ष्यांसोबत, हे म्हणायला झालं, पण तो संवाद मुळात तिचा स्वतःसोबतच होता. तिथे "दुसरा" कोणी नव्हताच मुळी. स्वतःच स्वतःशी बोलायचे आणि स्वतःच ते समजावून पण घ्यायचे. हे एकदा लक्षात आले आणि माउलींच्या "दुजेवीण अनुवादु" चीही खूण पटली.

पण जर हा "शब्देविण संवादु" हा कोणाशीच नसला तर? म्हणजे स्वतःशी देखील नाही, तर हे शक्य तरी आहे काय? परवाच गान-सरस्वती  किशोरी आमोणकर यांचे निधन झाले आणि अचानक त्यांची बऱ्याच वर्षांपूर्वी वाचलेली मुलाखत आठवली. त्यात त्यांनी सांगितले होते की त्या जास्त जाहीर कार्यक्रम करत नाहीत, कारण त्यामुळे त्यांच्या दररोजच्या रियाजात खंड पडतो. त्या म्हणाल्या "रियाज ही केवळ त्यांची साधनाच नव्हे तर ते त्यांचे जीवन आहे. पहाटे केलेल्या २ तासांच्या दररोजच्या रियाजामध्ये कधीकधी २ क्षण का होईना, पण असे काही सूर लागतात जे प्रयत्नपूर्वक कधीही लागू शकत नाहीत आणि ते कसे लागले तेही कळत नाही." एकप्रकारे ते जणू "देवाघरचे देणे. किंवा २ तासांचा रियाज म्हणजे परमात्म्याशी केलेला संवाद आणि ते २ क्षण म्हणजे त्याने पदरी टाकलेले दान. सगळी रियाजाची धडपड किंवा केलेला नेम हा सर्व काही त्या २ क्षणांसाठीच असणार. हे अलौकिकाचे २ क्षण केवळ गायकाच्याच नव्हे तर शास्त्रज्ञांच्या, तंत्रज्ञाच्या, कलाकाराच्या, किंवा ऑपरेशन करत असलेल्या डॉक्टरच्याही नशिबात येऊ शकतात. अट एकच, तुमची तयारी इतकी हवी की ते क्षण तुम्हाला ओळखता आले पाहिजेत.

आपलं संपूर्ण आयुष्य आणि त्यातली तपश्चर्या यांची भरपाई ते २ क्षण करू शकतात. पण ते २ क्षण कोणाच्या नशिबात असतील याची कुठलीही गॅरंटी नाही. आपल्याला फक्त प्रयत्न करत राहायचे असतात. इतिहासामध्ये ह्या २ क्षणांची अनेक उदाहरणे आहेत. जर्मन/ऑस्ट्रियन शास्त्रज्ञ लिझ माईट्नर (जिला खुद्द आईन्स्टाईनने "अणुबॉम्बची जननी" म्हणून गौरविले) हिला दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी Nuclear Fission ची कल्पना हिवाळ्यातील पानांवर ओघळणाऱ्या दवबिंदूकडे बघून सुचली. भौतिकशास्त्रातील नोबेल मिळवणाऱ्या आणि विसाव्या शतकातील सर्वात बुद्धिमान भौतिकज्ञ रिचर्ड फेनमन ह्याला त्याचे Quantum Diagrams, हॉटेलमध्ये वेळकाढूपणा म्हणून पेपर नॅपकिनवर मांडलेल्या प्रमेयातून सुचलीत.

आईन्स्टाईनने एकदा बोलून दाखविले होते की अश्या क्षणांची त्यांच्या आयुष्यातील बेरीज ही अवघ्या २-३ मिनिटांची होईल. कदाचित तादात्म्याच्या अश्याच क्षणांमध्ये वेदांची रचना झाली असणार. म्हणूनच ते रचणाऱ्या ऋषी-मुनींनी त्यांना "अपौरुषेय" म्हटले असेल का ? हे क्षण ज्यांना प्राप्त होतात, त्यांना त्या क्षणांमध्ये नक्की काय झाले आणि कसे झाले, हे दुसऱ्याला शब्दांत सांगायला फार कठीण जाते. स्वतःची कविता कशी निर्माण झाली, हे शब्दांतून इतरांना सांगायचे कवी ग्रेस यांचे फसलेले भगीरथप्रयत्न मी प्रत्यक्षात बघितलेले आहेत. हा जो निर्मितीचा किंवा सृजनाचा अलौकिक क्षण असतो तो अथांग अश्या शांततेतून निर्माण झालेला असतो आणि ती शांतता शब्दात कशी पकडणार ? ही अलौकिक शांतता किंवा त्यातून निर्माण झालेला निर्मळ आनंद शब्दात मांडायचा तरी कसा? सर्व गोष्टींचा अनुभव करणारामीच जेव्हा नाहीसा झाला आहे, तेव्हा सांगावे तरी कोणी, कोणाला आणि कसे ? ज्ञानेश्वर माउलींच्या पूर्ण ओळी मग पुन्हा नजरेसमोर येतात,

"शब्देविण संवादु, दुजेवीण अनुवादू। हे तंव कैसेनि गमे।
परेही परते बोलणे खुंटले। वैखरी कैसेनि सांगे ।।"

वींद्र केसकर



5 comments:

  1. सर्वांगसुंदर लेख.

    ReplyDelete
  2. अप्रतिम
    - रूपाली

    ReplyDelete
  3. फार दिवसांनी एक छान लेख वाचनात आला. सोपी, सरळ,ओघवती भाषा आहे ह्या लेखाची.

    ReplyDelete
  4. सहज सुरुवात ते अप्रतिम शेवट! खूप आवडला लेख.

    ReplyDelete